Pune Monsoon Update: पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! 7 जुलैपासून पुण्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
7 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केला आहे.
Pune Monsoon Update: 7 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केला आहे. IMD च्या मते 6 जुलैपासून पुढील काही दिवसांपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवार (6 जुलै) पासून, कमकुवत मान्सूनच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 5 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होईल. पुन्हा 6 जुलैपासून काही दिवस मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे, हवामान आणि वायु प्रदूषण मॉनिटरिंग युनिट, भारतीय हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत
यंदा पुणेकरांना उन्हाचा चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर पावसाची वाट बघत होते. काही दिवसांपुर्वी पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. पुणे ग्रामीण भागातील शेतकरीसुद्धा पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत. त्यामुळे पावासाकडे प्रत्येक पुणेकरांचे डोळे लागले आहेत. शेतकरी राजा देखील पावसाची आतुरतेनं वाट बघत आहे. दोन दिवस शहरात रिमझिम पावसाच्या सरी होत्या मात्र पेरणीसाठी जसा पाऊस लागतो तशा पावसाने अजूनही हजेरी लावली नाही आहे.
मुंबईसह कोकणात हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट
कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.