Harshvardhan Patil : मोठी बातमी! बारामतीची जागा राष्ट्रवादीला हे अजून ठरलेलं नाही, हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना डिवचलं
Baramati Lok Sabha Election : अजित पवार जरी महायुतीत आले असले तरीही इंदापूर विधानसभेची कुणीही चिंता करू नये असं सूचक वक्तव्य माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी केलं आहे.
पुणे : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडेच देण्याचा मोठा निकाल दिला. पण या निर्णयामुळे माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. अजित पवार महायुतीत आले असले तरी इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असं सूचक विधानही हर्षवर्धन पाटलांनी यावेळी केलं.
तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागत होती, पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर तशीच शांत झोप लागतेय का? असा प्रश्न विचारल्यावर, माझ्या मनात कोणतीही अशांतता निर्माण झालेली नाही असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. तसेच बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाचा चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही, असं म्हणत पाटलांनी अजित पवारांना डिवचले.
बारामतीवर अजित पवारांचा दावा
राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आणि अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्या ठिकाणचा खासदार निवडून आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष देऊन गाठीभेटी घ्यायला सुरू केल्या.
बारामती मतदारसंघाचे नेतृत्व सध्या सुप्रिया सुळे करत असून त्याच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे.
अंकिता पाटलांच्या नावाचीही चर्चा
बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांनीही तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी हा मतदारसंघ कुणाला मिळणार यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचं सांगत आता अजित पवारांना डिवचल्याची चर्चा आहे.
इंदापूरच्या जागेवरूनही सूचक वक्तव्य
अजित पवार महायुतीत आले असले तरीही इंदापूर विधानसभा मतदारसंघाची चिंता कुणीही करू नये असं सूचक वक्तव्य भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी केलं आहे. अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. त्यानंतर महायुतीमध्ये या जागेवर अजित पवार गटाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.
दत्ता भरणे हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: