Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली; आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय, महागड्या उपचारांचं टेन्शन कमी होणार
Guillain Barre Syndrome: आजाराबाबत आरोग्य विभागातर्फे मोठा निर्णय घेत, रूग्णांवरती योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
पुणे: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा आजार झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे महापालिकेने या आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान या आजाराबाबत आरोग्य विभागातर्फे मोठा निर्णय घेत, रूग्णांवरती योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) पेशंटची संख्या पुण्यामध्ये वाढलेली आहे. त्यामध्ये पाण्यामुळे इन्फेक्शन होते, ही बाब निदर्शनास आली आहे. आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या हा आजार महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या आजारवरील उपचारांसाठी रूग्णालये अनावश्यक बिल जरघेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे, अशी माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. प्रतिकारक्षमता कमी झाली की गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असंही पुढे त्यांनी सांगितलं आहे.
'महात्मा फुले जनआरोग्य योजने' अंतर्गत उपचार
'गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 'महात्मा फुले जनआरोग्य योजने' अंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मयदित दुपटीने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून 80 हजार रुपये दिले जात होते. ती आता दुप्पट करत एक लाख 60 हजार करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना असलेल्या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. 24) हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
दरम्यान या संबंधिचे पत्र 'राज्य आरोग्य हमी सोसायटी'ने पुणे परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालकांना पाठवले असून त्यामध्ये म्हटले आहे की, पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्ये 'जीबीएस'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या रुग्णांना फुप्फुसविषयक न्यूमोनिया आजार निदान होत आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर उपचार घ्यावे लागत आहेत. याबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' व 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरो योजने'मधील 'जीबीएस'च्या उपचारांची रक्कम 80 हजाराने वाढवून एक लाख 60 हजार इतकी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले होते, त्यानुसार हे पॅकेज वाढवले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
काय होणार फायदा ?
ही योजना असलेल्या रुग्णालयांमध्ये 'जीबीएस'चे उपचार घेतल्यास ते पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. त्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे रुग्णालयांना आकारता येणार नाही, त्यामुळे, रुग्णांवर पैशांचा भार पडणार नाही. यामधील रुग्णालयांची माहिती योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
योजनेत असलेली पुण्यातील महत्त्वाची रुग्णालये कोणती?
1) आदित्य बिर्ला रुग्णालय, चिंचवड 2) एम्स रुग्णालय, औंध 3) भारती रुग्णालय, धनकवडी 4) डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपर 5) ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर रस्ता 6) श्रीमती काशीबाई नवले रुग्णालय, नन्हे 7) सिंबायोसिस रुग्णालय, लवळे 8) ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे, 9) वायसीएम रुग्णालय, पिंपरी 10) जिल्हा रुग्णालय, औंध.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )