पुण्यात तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल, पतीकडून पत्नीला पोस्टाने तलाक
तिहेरी तलाक विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पहिला पुण्यात याप्रकरणी पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. जावेद नासिर शेख असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
पुणे : तिहेरी तलाक विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर मुस्लीम समाजातून बहुतांश महिला वर्गाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावर दीर्घकाळ चर्चा देखील झाली. या सर्व घडामोडींनंतर पुण्यातील हडपसर भागातील एका महिलेला तिच्या पतीने पोस्टाने तीन वेळा तलाक लिहिलेली नोटीस पाठवली. त्यानंतर या तलाकच्या विरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये संबंधित महिलेने तक्रार दिली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर तिच्या पतीवर तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिहेरी तलाकविरोधात कायदा संमत झाल्यानंतर पुण्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. जावेद नासिर शेख असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जावेद नासिर शेख याचे मागील काही महिन्यापासून पत्नीसोबत भांडण सुरु होते. सततच्या भांडणामुळे दोघांनीही घटस्फोट घेण्याचं ठरवलं होतं.
दोघांच्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित होतं. दरम्यान 9 ऑक्टोबर 2019 रोजी जावेद नासिर शेख याने, "मै जावेद नासिर शेख, रिनाज जावेद शेख तुमको तलाक देता हू", असं तीन वेळा एका कागदावर लिहून आपला विवाह संपुष्टात आला, असं लिहिलेली नोटीस पोस्टाने पत्नीला पाठवली. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.