Ajit Pawar : अजित पवारांना गावबंदीचा फटका, बारामतीचा दौरा रद्द, सूत्रांची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द झाल्याची माहिती एबीपी माझाच्या सुत्रांनी दिली आहे. अजित पवार माळेगाव सारख कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीत जाणार होते.
बारामती, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द झाल्याची माहिती एबीपी माझाच्या सुत्रांनी दिली आहे. अजित पवार माळेगाव सारख कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीत जाणार होते. मात्र सकल मराठा समाजाच्यावतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्याने त्यांच्या दौऱ्यासाठीदेखील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. शिवाय आंदोलनाचा इशारादेखील दिला होता. त्यामुळे कदाचित त्यांनी दौरा रद्द केल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात येत आहे. माळेगाव कारखान्यापर्यंत अजित पवारांना जाऊ दिलं जाणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला आहे. कार्यकर्त्यांकडून मोठ्याने घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या विरोधातदेखील बारामतीत घोषणाबाजी केली जात आहे. राजकीय पुढाऱ्यांसह नेत्यांना बारामती तालुक्यात फिरकू देणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, असं पत्र बारामतीतील कार्यकर्त्यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात दिलं होतं. त्यानंतर पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांनी बैठक झाली ही बैठक निष्फळ ठरली. अजित पवारांना कोणत्याही परिस्थितील माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजनाला येऊ देणार नाही या भूमिकेवर मराठा कार्यकर्ते ठाम होते.
500 पोलिसांचा तगडा बंदोबस्त...
अजित पवारांच्या दौऱ्यावेळी धरपकड होऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये. यासाठी कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तब्बल 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मराठ्यांनी घोषणाबाजी करु नये, असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे.
पुण्याच्या घरी दाखल
दुपारी एक वाजता अजित पवार माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पुजनासाठी जाणार होते. मात्र त्यांना गावबंदीचा फटका बसल्याचं दिसत आहे. मराठ्यांचा आक्रोश पाहून अजित पवारांनी बारामती बारामती दौरा रद्द केला असावा किंवा टाळलं असावं अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. बारामतीला जाण्याऐवजी अजित पवार पुण्यात दाखल झाले आहेत.
राज्यभर कार्यकर्ते आक्रमक
राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुढाऱ्यांना आणि नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. याचा फटका अनेक पुढारी आणि नेत्यांना बसत आहे. काल पुण्यात विरोधीपक्षनेते अंबादास दानवे याच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. अशीच परिस्थिती राज्याच्या वेगवेगळ्या भागात दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-
Sanjay Raut: "ते पुन्हा येणार असतील तर स्वागत", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला