Ajit pawar Banner : पिंपरीमध्ये क्रिकेट स्पर्धा ठाकरेंच्या शिवसैनिकांची, हवा अजित पवारांची, प्रकरण काय?
Ajit pawar Banner : पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मोरेश्वर भोंडवेंनी आयोजित केलेल्या स्पर्धेत शिवसेनेच्या नेत्यांऐवजी अजित दादांचे फोटो झळकलेत.
पुणे: पिंपरीत शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकाने (Shivsena UBT) आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची चर्चा रंगली आहे. त्याला कारण ही तसंच आहे. पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) नेते मोरेश्वर भोंडवेंनी आयोजित केलेल्या स्पर्धेत शिवसेनेच्या नेत्यांऐवजी अजित दादांचे (Ajit Pawar) फोटो झळकलेत. चिंचवड विधानसभा लढण्याच्या हेतूने मोरेश्वर भोंडवेंनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, ठाकरेंनी (Ajit Pawar) तिकीट नाकारलं आणि 360 डिग्रीत भोंडवेंनी घरवापसी केली. मी अजित दादांच्या (Ajit Pawar) सल्ल्यानेच मशाल हाती घेतली होती आणि महाविकास आघाडीत राहून महायुतीच्या शंकर जगतापांना आमदार केलं होतं, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना भोंडवेंनी अजित दादांना अडचणीत आणणारा दावा करुन टाकला.
काय म्हणालेत मोरेश्वर भोंडवे?
त्यानंतर आता अजित दादांनी मला राष्ट्रवादीत सामावून घेतलं आहे, त्यामुळं मला पक्षप्रवेशाची गरज नाही. मी आगामी महापालिका निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचं ही स्वतः मोरेश्वर भोंडवेंनी जाहीर करून टाकलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेच्या मैदानात अजित पवारांचे फोटो लावून त्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्याने चर्चा सुरू आहेत.
तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी बोलताना मोरेश्वर भोंडवे म्हणाले, 'अजित दादा पहिल्यापासून आमचे दैवत आहेत. मी अजित दादा यांच्यात पक्षात आहे. दादांना चिंचवड विधानसभेमध्ये जागा नव्हती म्हणजे बीजेपीसाठी सोडली होती, त्यामुळे मी दादांना सांगितलं की, मी जरा पर्याय शोधतो. दादांना विचारून मी हे सगळं केलेला आहे. दादा म्हणाले तुम्हाला हवा तो निर्णय घ्या. आता मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात आहे. आमच्या पक्षात एखाद्यावेळी एखाद महिना इकडे तिकडे गेला तरी फरक पडत नाही, मला विधानसभेला निवडणूक लढवायची होती. उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे मी ठाकरे गटात गेलो होतो. त्याचबरोबर पुढच्या वेळी रावेत वेगळा होईल, तेव्हा अजित दादा मला तिकीट देतील आणि घड्याळ चिन्हासाठीच इथली जागा सुटणार असा आमचा विश्वास आहे. तिकडे रावेत विधानसभा होण्याची चिन्हे आहेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, विधानसभेवेळी दादांनी मला फोन केला होता, आता तुला तिकीट भेटलं नाही. तर शंकर जगताप यांना सहकार्य कर, त्याप्रमाणे मी त्यांना सहकार्य केलं. 1992 पासून आम्ही दादा सोबत आहोत अजित दादा खासदार होते तेव्हापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असाही पुढे मोरेश्वर भोंडवे यांनी म्हटलं आहे.