Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 9; राज्यात एकूण 12 कोरोनाग्रस्त
पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 9 झाली असून राज्यात आता एकूण 12 कोरोनाग्रस्त आहे. अशातच या सर्व कोरोनाग्रस्त रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं माहिती विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे.
पुणे : पुण्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या 9 झाली असून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 12 वर पोहोचली आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे, पुण्यात आढळून आलेला 9वा रूग्ण दुबईहून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कातील नाही. हा रूग्ण अमेरिकेहून 1 मार्च रोजी पुण्यात परतला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 9 झाली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 12 झाली आहे. पुण्यात 9, मुंबईत 2 तर नागपुरात एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. पुण्यातील नऊपैकी सात कोरोनाबाधित हे दुबईला फिरायला गेले होते, तर आठवा रुग्ण त्यांना मुंबई एअरपोर्टवरून पुण्याला घेऊन जाणारा ड्रायव्हर होता. तसेच पुण्यातील 9वा रूग्ण हा यांच्या संपर्कातील नसून हा रूग्ण एक मार्च रोजी अमेरिकेहून भारतात परतला होता.
नागपूरातील कोरोनाबाधितही अमेरिकेहून परतला
अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. बुधवारी (11 मार्च) प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार या व्यक्तीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. तरी, अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कोणाकोणाच्या संपर्कात आली याचा शोध घेणे सुरु आहे. नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
Corornavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित
नागपुरातील अकरा संशयित रुग्णांपैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांचे अहवाल आलेले नाहीत. बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अहवाल प्राप्त झाला असून यात एकाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीचे वय 45 ते 50 च्या दरम्यान असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित
कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus Test at Home | घरबसल्या कोरोना तपासा 10 सेकंदात | ABP Majha
परदेशातून येणाऱ्यांचे व्हिसा रद्द
परदेशातून भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. यामधून राजनीतीज्ञ आणि यूएन कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून येणारे भारतीय 14 दिवसांसाठी देखरेखीखाली असतील.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आयोगने 13 मार्च रोजी होणारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. एअर इंडियाने इटलीला जाणारी विमानं 28 मार्च आणि दक्षिण कोरियाला जाणारी विमानं 25 मार्चपर्यंत रद्द केली आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 12462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आयपीएलवर कोरोनाचं संकट
दरम्यान यंदा महाराष्ट्रात खेळले जाणारे आयपीएलचे सामने कदाचित स्टेडियमऐवजी फक्त टीव्हीवरच पाहायला लागणार आहेत. कारण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आयपीएलच्या सामन्यांच्या तिकीट विक्रीवर बंदी आणण्याचा विचार सरकार गांभीर्याने करत आहे. तर, भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत पर्यटक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात खेळाडूंबद्दल स्पष्ट उल्लेख नसल्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबाबत आता शंका व्यक्त होत आहे.
IND Vs SA, Coronavirus | प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील सामने
युरोपच्या पर्यटकांना 30 दिवस अमेरिकेत प्रवेशबंदी
अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 31 जणांचा बळी घेतला आहे. तर संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्याही हजारावर गेली आहे. देशाच्या 30 राज्यात विषाणूचा प्रसार झाला असून अनेक राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 30 दिवसांसाठी युरोपच्या पर्यटकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातल्याचं जाहीर केलं आहे. न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
संबधित बातम्या :
#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप
Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण
Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं