एबीपी माझाच्या बातमीनंतर पिंपरी चिंचवड मधील लघुउद्योगांसाठी असलेल्या जाचक अटींमध्ये बदल
पिंपरी चिंचवड शहरात आज मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. मात्र, यामुळे लघुउद्योजक नाराज झाले होते. एबीपी माझाने ही नाराजी समोर आणल्यानंतर लॉकडाऊनमधील काही अटींमध्ये बदल करण्यात आलेत.
पिंपरी चिंचवड : महापालिका क्षेत्रात लघुउद्योगांना देण्यात आलेल्या जाचक अटींमध्ये प्रशासनाने अखेर बदल केलेत. आता कामगारांना स्वतःच्या दुचाकीवरून कंपनीत येण्याची परवानगी देण्यात आलीये. तसं सुधारित परिपत्रकात महापालिकेने नमूद केलं आहे. एबीपी माझाने लघुउद्योजकांची नाराजी समोर आणली होती. त्यानंतर काही तासातच अटींमध्ये सुधारणा करण्यात आली.
आधी चारचाकी वाहन अथवा निश्चित केलेल्या बसमधूनच कामगारांना कंपनीत येण्याची परवानगी होती. त्यात बदल करत दुचाकीची ही मुभा देण्यात आली आहे. यासोबतच वाहन पास देण्यासाठी कंपनीच्या एचआरला अधिकार देण्यात आलेत. कंपनीच्या लेटर हेड वर दिल्या जाणाऱ्या परवानगी बाबतची माहिती पोलिसांना कळवण मात्र बंधनकारक आहे.
काय होती नाराजी? पिंपरी चिंचवडच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग आणि आयटी कंपन्या सुरुच राहणार हे आता निश्चित झालंय. महापालिकेने तसं परिपत्रकात नमूद केलंय. पण कर्मचाऱ्यांना कंपनीत आणण्यासाठी औद्योगिक कंपन्यांना चारचाकी वाहन अथवा निश्चित केलेल्या बसचीच परवानगी राहील. तर जी कंपनी कर्मचाऱ्यांची कंपनीतच राहण्याची सोय करेल त्यांना कोणतीही अडचण नसेल. पण प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्र बाळगणं बंधनकारक असेल. तसेच कंपनीत कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या कंपनीला स्व-खर्चातून कराव्या लागणार आहेत. तसेच उद्योग बंद ही ठेवावा लागणार आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग अर्थात आयटी कंपन्या 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्यात. यातील काही अटी जाचक असल्याने लघुउद्योजकांनी त्यास तीव्र विरोध केला होता. यात आता सुधारणा केल्या आहेत.
पुणे, पिंपरी चिंचवड क्षेत्रात लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद राहणार?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमधे 13 तारखेला मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीचा, पुणे कॅन्टेन्मेट आणि हवेली तालुक्यातील गावांचा यामधे समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल.
पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी लागू राहणार आहे. 14 जुलैच्या 12 वाजता ते 23 जुलैच्या 24 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. या दरम्यान वाहतुकीस तसेच प्रत्येक मार्ग, गल्ली, सार्वजनिक ठिकाणी उभं राहण्यास ही मनाई असणार आहे. केवळ परवानगी देण्यात आलेल्यांना संचारबंदीतून मुभा असेल.
Pune Lockdown | पुण्यात लॉकडाऊन, नियमावलीमुळे पिंपरी चिंचवडमधील लघुउद्योजकांची नाराजी