(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोस्टातील नोकरी परत मिळवण्यासाठी पुण्यात दिव्यांग उमेदवारांचं उपोषण
गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन आम्हाला सेवेत परत रुजू करून घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलक उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
पुणे : पुण्यातील जनरल पोस्ट ऑफिससमोर उमेदवारांचं उपोषण आठव्या दिवशीही सुरुच आहे. पोस्टाने नोकरीत परत रुजू करुन घ्यावं यासाठी येथील दिव्यांग उमेदवार उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातून विविध भागातून आलेले जवळपास 250 उमेदवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनाचं नेमकं कारण काय?
2016 मध्ये पोस्टाच्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलची भरती करण्यात आली होती. त्यावेळी या सगळ्या उमेदवारांना पोस्टात रुजू करुन घेण्यात आलं. पण आठ महिन्यांनंतर त्यांना अचानकपणे टर्मिनेशनची ऑर्डर दिली आणि सेवामुक्त करण्यात आलं. जवळपास 2400 उमेदवारांना अशाप्रकारे एकाचवेळी सेवामुक्त करण्यात आलं, असं या आंदोलनकरत्यांचं म्हणणं आहे.
त्यानंतर या उमेदवारांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. दोन वेळा खटला चालला आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाने पोस्टाला या उमेदवारांना परत रुजू करुन घेण्याचे आदेश दिले. पण अजूनही त्यांना रुजू करुन घेतलं नसल्याने त्यांनी अखेरीस हे आंदोलन सुरु केलं आहे. पुण्यातील साधू वासवानी चौकाजवळच्या जनरल पोस्ट ऑफिससमोर हे उमेदवार उपोषणाला बसले आहेत.
गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन आम्हाला सेवेत परत रुजू करून घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलक उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
या उपोषणकर्त्यांमध्ये देवानंद भिवा रासेराव हे एक दिव्यांग उपोषणकर्ते आहेत. ते अंध असून पोस्टमन या पदावर त्यांना रुजू करुन घेण्यात आलं होतं. मात्र 2016 मध्ये त्यांचीही नोकरी गेली. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी परवड होत असल्याचं त्यांनी सांगितलं. आता परत नोकरीसाठी आम्ही कुठे फिरायचं असा प्रश्न हे उमेदवार विचारत आहेत.