Shrirang Barne : मोदींच्या सभेनंतरही महायुतीत खदखद कायम; प्रचारावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीचं पथक मावळात पाठवण्याची 'वेळ'.
सलग दोन वेळा खासदार झाल्यानंतर श्रीरंग बारणेंनी हॅट्रिक साधण्यासाठी शड्डू ठोकलेत. मात्र ज्यांच्या जीवावर बारणेंना तिसऱ्यांदा दिल्लीवारी घडवायची आहे, ते महायुतीतील घटक पक्ष बारणेंच्या पायात पाय घालताना दिसतायेत.
मावळ, पुणे : सलग दोन वेळा खासदार झाल्यानंतर श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barne) हॅट्रिक साधण्यासाठी शड्डू ठोकलेत. मात्र ज्यांच्या जीवावर बारणेंना तिसऱ्यांदा दिल्लीवारी घडवायची आहे, ते महायुतीतील घटक पक्ष बारणेंच्या पायात पाय घालताना दिसतायेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सभेनंतर ही खदखद कायम असल्यानं, दिल्लीतील सहा जणांचं पथक आता मावळ लोकसभेत (Maval Loksabha election) येऊन धडकलं आहे. स्वतः बारणेंकडून याची माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.
लोकसभेची चाहूल लागली तेंव्हापासून बारणेंना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचा तीव्र विरोध होता. हा विरोध हाणून पाडण्यासाठी बारणेंकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली. मात्र उमेदवारी जाहीर झाली तरी प्रचारात दिसणारे पदाधिकारी प्रत्यक्षात महायुतीचा धर्म पाळत नसल्याचं चित्र आहे.
महायुतीतील ही अंतर्गत खदखद अगदी दिल्ली दरबारी ही पोहचली होती. म्हणूनच 29 एप्रिलला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मावळसाठी सभा घेतली. बारणेंच्या प्रचारासाठी मोदी मैदानात उतरले तरी महायुतीतील खदखद मिटल्याचं काही चित्र नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बारणेंना याची मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे याचा फायदा सरळसरळ उद्धव ठाकरेंच्या संजोग वाघेरेंना होणार हे उघड आहे. वाघेरे पूर्वश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते राहिलेत. पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय म्हणून वाघेरे कुटुंबाकडे पाहिलं जातं. किंबहुना शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यानेच वाघेरेंना शिवसेनेच्या तिकिटावर मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरवल्याचं बोललं जातं.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून सुरू असलेला प्रचार याची साक्ष पदोपदी देत ही आहे. हा भाग वेगळा की अजित पवार स्वतः बारणेंचा अर्ज दाखल करायला होते. मात्र 'अजित पवार बोले, तैसे न चाले' हा पूर्व इतिहास बारणेंना ही ठाऊक आहेच. गेल्या लोकसभेत बारणेंनी अजित पवारांचे पुत्र पार्थचा दारुण पराभव केला होता, याचा बदला घेण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी 'डबल गेम' खेळत असल्याची चर्चा मावळात रोज रंगत असतेच. बारणेंना ही याचीच भीती आहे.
दुसरीकडे भाजपचे ही पदाधिकारी प्रचारात बारणेंसोबत दिसतात. पण बारणे रायगड जिल्ह्यातील विधानसभेत गेले की पुणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी ही गायब होऊन जातात. बारणेंनी फक्त भाजपचा फायदा खासदार होण्यासाठी घेतात, नंतर पाच वर्षे आमच्याकडे डोकावून पाहत नाहीत. मग आम्ही त्यांचा प्रचार का करावा? असं खाजगीत ते बोलून दाखवतात. हे बारणेंच्या ही कानावर पडलेलं आहेच. त्यामुळंचं बारणेंनी दिल्ली दरबारी महायुतीतील घटक पक्ष नेमकं काय करतंय, याचा लेखाजोखा मांडलेला आहे. मोदींच्या पुण्यातील सभेनंतर ही त्यात काही सुधारणा होत नसल्यानं, अखेर दिल्लीहून सहा जणांचं पथक मावळ लोकसभेत पाठवण्याची 'वेळ' आलेली आहे. या पथकाची नजर आता मावळच्या प्रचारावर असणार आहे. ही माहिती बारणेंनी माध्यमांना दिलेली आहे. जेणेकरून त्यांच्या विरोधात खेळी करणाऱ्यांपर्यंत हा संदेश पोहचावा, हा हेतू आहे. पण दिल्लीचं पथक मावळात आल्यानं खरोखरच बारणेंचा प्रचार महायुतीचे घटक पक्ष करणार का? बारणेंचं धनुष्यबाण दिल्ली दरबारी पोहचणार का? की महायुतीच्या मदतीनेच संजोग वाघेरेंची 'मशाल' पेटणार? हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल.
इतर महत्वाची बातमी-
कुठे ऊन, कुठे पाऊस! ठाणे, मुंबईत उन्हाच्या झळा, IMD कडून यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात पाऊस