वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Assembly Election 2024 : यंदा वर्ध्यात 69 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता वर्ध्यातील वाढलेली टक्केवारी कुणाला तारणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
वर्धा : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. राज्याच्या काही भागांत अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान सुरु होतं. वर्धा जिल्ह्यात देखील 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा वर्ध्यात 69 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता वर्ध्यातील (Wardha News) वाढलेली टक्केवारी कुणाला तारणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
वर्धा जिल्ह्यात चारही मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला आहे. प्रशासनाने केलेली जनजागृती, मतदार यादीची अचूक छाननी यामुळे हे मतदान वाढले आहे. 2019 च्या तुलनेत सात टक्क्यांनी मतदानात वाढ झाल्याने हे वाढलेले मतदान कुणाला फायद्याचे ठरणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या.
वर्ध्यात 69.29 टक्के मतदान
काही मतदारसंघात महिलांची संख्या जास्त बघायला मिळाली तर कुठे मुस्लिम बांधव सकाळपासून मतदानाला बाहेर पडले होते. त्यामुळे वाढीव मतदान कुणाचे? हा प्रश्न चर्चेत आहे. वर्धा जिल्ह्यात 69.29 टक्के इतके मतदान झाले आहे. आर्वी मतदारसंघात 71.86 टक्के मतदान झाले. वर्ध्यात चार मतदार संघामध्ये सर्वात कमी 65.68 टक्के इतके मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील मतदानाचा वाढलेला टक्का जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीची पावती देऊन गेला आहे. पण हे वाढलेले मतदान महायुती की महाविकास आघाडीला विजय मिळवून देते? याचे चित्र 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विदर्भात एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?
लोकशाही रुद्र एक्झिट पोलची आकडेवारी-
विदर्भ - (एकूण जागा 62)
भाजप - 23
शिवसेना (शिंदे गट) - 04
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
काँग्रेस - 21
शिवसेना (ठाकरे गट ) 04
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 04
ZEE AI POLL एक्झिट पोलची आकडेवारी-
विदर्भ (एकूण जागा 62 )
महायुती 32-37
मविआ 24-29
इतर 0-2
SAS GROUP HYDRABAD एक्झिट पोलची आकडेवारी-
विदर्भ (एकूण जागा 62)
मविआ 33-35
महायुती 26-27
इतर 2-3
आणखी वाचा