Dream 11 Pune : ड्रीम 11मुळं कोट्यधीश झालेल्या PSIच्या अडचणीत वाढ, भाजप सरचिटणीसची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
ड्रीम 11 या ऑनलाईन गेममधून त्यांनी दीड कोटी जिंकले आणि त्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले आणि कारवाईच्या कचाट्यातदेखील अडकले. आता भाजपचे सरचिटणीस अमोल थोरातांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली आहे.

पुणे : पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंसाठी करोडपती झाल्याचा आनंद हा क्षणिकच राहिला. ड्रीम 11 या ऑनलाईन गेममधून त्यांनी दीड कोटी जिंकले आणि त्यानंतर ते प्रसिद्धीझोतात आले आणि कारवाईच्या कचाट्यातदेखील अडकले. आधीच पोलीस उपयुक्तांकडून त्यांची चौकशी सुरू झाली आहे, अशातच भाजपचे सरचिटणीस अमोल थोरातांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पीएसआय झेंडेंची तक्रार केली आहे आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.
वर्दीत ते ही ऑन ड्युटी ऑनलाईन गेमिंग मधून पैसे मिळवणं आणि त्याच वर्दीत छाती ठोकपणे माध्यमांपुढं येऊन सांगणं, यातून तरुणांना त्यांनी अशा ऑनलाइन गेम खेळण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप थोरातांनी केला आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांनी खाते निहाय चौकशीचा फास आळवला आहे. वर्दीत ऑनलाईन गेम खेळणं कायद्यात बसतं का? त्यातून रक्कम मिळाल्यावर माध्यमांना वर्दीत उभं राहून मुलाखत देता येते का? या अंतर्गत झेंडेंची पोलीस उपायुक्त चौकशी करत आहेत.
पुढच्या काही तासांमध्ये याचा सविस्तर अहवाल येणं अपेक्षित आहे. तरुण अशा ऑनलाईन गेमला आहारी जाऊ नयेत, आणि त्यात त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून पोलिसांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. पण इथं तर स्वतः पोलीस अधिकाऱ्यानेच या माध्यमातून समाजात एक चुकीचा संदेश दिल्याचं अनेकांकडून बोललं जातंय. त्यामुळं पोलीस आता त्यांच्याच पीएसआय झेंडेना दोषी ठरवतं की हा केवळ कारवाईचा फार्स ठरतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
प्रकरण काय?
झेंडे यांना क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले आहे. मागील दोन- तीन महिन्यांपासून झेंडे यांनी ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस सागरला मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
पिंपरी चिंचवडमधील पीएसआयचे भाग्य उजळलं; ड्रीम इलेव्हनमध्ये जिंकलं तब्बल दीड कोटींचं बक्षीस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
