Ajit Pawar on PM Modi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द का झाला? अजित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले, 'पुणेकरांची गैरसोय...'
Ajit Pawar on PM Modi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द झाला आहे, पुण्यात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिल्याने दौरा रद्द करण्यात आला आहे.
पुणे: आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा होणारा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) करण्यात आल्याची माहिती आहे. मोदींच्या हस्ते आज सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) पुणे दौरा करण्यात आला आहे. हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान मोदींचा दौरा रद्द झाल्याने विरोधकांनी मोदींसह सत्ताधाऱ्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेमकं काय झालं याबाबची माहिती दिली आहे.
अमरावती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) बोलताना सांगितलं, आम्हाला पीएम ऑफिसचा फोन आला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दुपारी तीन वाजतापासून पुन्हा पाऊस येणार असल्याचा अंदाज होता. यायला जायला लोकांना त्रास होत होता, पुणेकरांची गैरसोय होईल आणि नागरिकांना त्रास होईल त्यामुळे आम्ही पुण्यातील शाळेला सुद्धा सुट्टी दिली होती. आम्ही पूर्ण काळजी घेतली होती पण पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम रद्द नाही तर पुढे ढकलला आहे, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली आहे.
लवकरात लवकर मेट्रो पुणेकरांसाठी उपलब्ध करण्यात येणार
पावसामुळे दौरा रद्द करावा लागला, पण मेट्रोचं उद्घाटन होणार का? मेट्रो सर्वसामान्यांसाठी कधी खुली होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तर मेट्रोची सिव्हील कोर्ट ते स्वारगेट ही मार्गिका आज सर्वसामान्यांसाठी खुली होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रद्द झालेला आजचा दौरा पुढच्या काही दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या विचार विनिमयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच उपस्थितीत मेट्रो मार्गिका सुरु करण्याबद्दल भाजपचे नेते आग्रही आहेत. त्यानंतर प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाची शक्यता असल्याने नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे. मात्र मेट्रोचं काम पूर्ण झालं आहे आणि लवकरात लवकर मेट्रो पुणेकरांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा
आज, 26 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाने राज्याच्या अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहराला पावसाचा अलर्ट (Pune Heavy Rain) देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा तसेच कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात आज संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.