(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही फूट पडली. अजित पवारांसोबत जास्तीत जास्त आमदार गेले, तर शरद पवारांनी (Sharad Pawar) मोजक्याच आमदारांना सोबत घेऊन लोकसभेची खिंड लढवली. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 जागांवर तुतारी चिन्हावरील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) 4 पैकी एकच उमेदवार खासदार बनला आहे. त्यामुळे, साहजिक शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांचा उत्साह वाढला आहे. त्यातच, आता अजित पवारांचा (Ajit Pawar) पिंपरी चिंचवडमधील दोन युवा नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. तत्पूर्वी मुंबईत या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्यासमेवत चर्चा केली होती.
विशाल वाकडकर यांची मे 2022 मध्ये म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष एकच असताना राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यावेळी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच होते. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वाकडकर हे अजित पवारांसमवेत गेले होते. आता, लोकसभा निवडणुकांनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आणि राजकीय वातावरण लक्षात घेत वाकडकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहून तुतारी वाजवण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार, मुंबईतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पिंपरी चिंचवडमधील दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. अजित पवारांसाठी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येच राष्ट्रवादीला खिंडार पडल्याने आगामी विधानसभा निवडणुकांपर्यंत काय-काय होईल, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विधानपरिषद निवडणुकीतही पराभव
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागा जिंकता आली. नुकतेच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीतील अनेक आमदार व पदाधिकारी आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातो. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी असा दावा केला होता.