(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते अजित पवारांनी सांगावं, चंद्रकांत पाटलांचा सवाल
एसटीचे विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांचा परखडपणा सगळीकडे चालणार नाही, एसटीचे विलिनीकरण का होणार नाही ते त्यांनी सांगावं अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले आहे. एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ठणकावलं होत. कोणत्याही सरकारच्या काळात एसटीचं विलिनीकरण शक्य नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटीच्या विलिनीकरणाची मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक सूचक वक्तव्य केले होते. एसटी कामगाराचं शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना दिली होती. एसटी कामगारांच्या संपाबद्धल शासनाची भूमिका मांडली. त्यात ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू हायकोर्टात आहे, हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केलेला आहे, त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचं शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका असे अजित पवार म्हणाले होते.
एसटी कामगार शासनात विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी ते गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करुनही ते संपावर कायम आहेत. मागील आठवड्यात कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनेच्या नेत्यांनी संप माघारी घेत असल्याची घोषणाही केली होती, त्यानंतरही संपावरील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
राज्य सरकार हे गेंड्यांच्या कातडिशीवाय भयानक झाले आहे, असे म्हणत जोरदार निशाणा पाटील यांनी लगावला. म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत मोठा भष्ट्राचार झाला आहे. यामध्ये सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. या प्रकरणामध्ये अनेक मंत्री अडकण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला. सीबीआय चौकशीनंतर सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले. फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस हे योग्य वेळी कोर्टासमोर जातील असे त्यांनी सांगितले.
आज देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. यानिमित्त पुण्यात अटलशक्ती महासपर्क अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यामध्ये सहभागी झाले आहेत. कोथरुड येथील गांधीभवन येथे सोसायटीतील मतदार आणि बूथ प्रमुख यांना भेटून केंद्राच्या योजनांची माहिती दिली जात आहे. पुण्यातील दीड लाख कुटूंबापर्यंत भाजपचे 30 हजार कार्यकर्ते आज पोहोचणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना प्रत्येक घरापर्यंत जाऊन सांगणार असल्याचं त्यांनी सांगितले.