(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar VS Ajit Pawar : पुण्यात जिथं काका तिथं पुतण्या सुरुच; शरद पवारांनी मेळावा घेताच अवघ्या 15 दिवसांत अजित पवार सुद्धा पोहोचले!
अवघ्या 15 दिवसांपूर्वी पुण्याच्या जुन्नरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. त्याला 15 दिवसही होत नाही, तोवर अजित पवारही जुन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याला उपस्थित झाले.
जुन्नर (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं आहे. अजित पवार गटाकडून पक्षावरही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संबंध टोकाला गेले आहेत. अवघ्या 15 दिवसांपूर्वी पुण्याच्या जुन्नरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. त्याला 15 दिवसही होत नाही, तोवर अजित पवारही जुन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याला उपस्थित झाले. आजवर स्वतःला तटस्थ म्हणवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनकेंनी या मेळाव्याचे आयोजन केलं आहे.
शरद पवार काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकरांना जुन्नर विधानसभेचे तिकीट देणार ही चर्चा सुरू झाल्याने अखेर बेनके यांनी ही भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांसोबत मंचावर महायुतीच्या तिकिटावर शिरूर लोकसभा लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असणारे शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील सुद्धा उपस्थित होते.
दादांच्या नेतृत्वाखाली प्रवास भविष्यात करावा लागणार
आमदार अतुल बेनके म्हणाले की, शरद पवारांप्रमाणेच अजित पवारही शेतकऱ्यांचा आश्वासक चेहरा आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अजित दादा तुम्ही या निर्णयाबाबत विचार कराल, अशी आम्हा शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. अजितदादा बिबट्यांचा बंदोबस्त लावा. प्रत्येकाला आता दिवसाचं बिबट्याचं दर्शन घडत असल्याने भीतीचं वातावरण आहे. जर या बिबट्यांचा बंदोबस्त झाला नाही तर भविष्यात बिबट्यांचा मेळावा घ्यावा लागेल.
ते पुढे म्हणाले की, दादांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील प्रवास करावा लागणार आहे. अजित पवार हा सच्चा माणूस आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय नाही, जनतेच्या हितासाठी मी निर्णय घेत आहे. दादा हे आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला आणि राज्याला मिळालेलं खंबीर नेतृत्व आहे. जुन्नर तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा (विधानसभा निवडणुकीत) कायम फडकत राहील, असा शब्द देतो असेही ते म्हणाले.
अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं
दरम्यान, या मेळाव्यात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, असे मत व्यक्त केले. अजितदादांनी एकदा राज्याचं नेतृत्व करावं. मग कामातील बदल तुम्हा सर्वांना नक्की जाणवेल, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही आमची भावना आहे. त्याअनुषंगाने सरकारचा प्रयत्न राहणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर हेच शेवटपर्यंत आदर्श राहणार आहेत. मात्र, राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात, तसाच निर्णय अजित दादांनी घेतल्याचे ते म्हणाले. पतसंस्थांमधील एक लाखांच्या ठेवींना संरक्षण देण्याचा निर्णय, राज्य सरकार लवकरच घेईल. अजितदादांच्या साक्षीने हा शब्द देतो, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या