Manoj Jarange Patil : मुंबईतील मराठा वादळाची चाहुल अन् पोलिसांकडून मनोज जरांगेंना वाटेत गाठत 'चर्चा पे चर्चा' सुरुच!
Manoj Jarange Patil : नवी मुंबई पोलिसांकडून मार्ग बदलण्यासाठी विनंती जरांगे पाटील यांना करण्यात आली. मात्र, मला या भागातील कोणतीच माहिती नसल्याचे सांगत कोणताच निर्णय दिला नाही.
लोणावळा (पुणे) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंतरवाली सराटीतून पदयात्रा काढत पुण्यापर्यंत पोहोचलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिवसागणिक राज्य सरकारला धडकी भरवली आहे. यामुळे मुंबईच्या (Mumbai) वेशीवरती मराठ्यांचं वादळ पोहोचल्यानंतर आता राज्य सरकारची पळापळ सुरू झाली आहे. त्याचबरोबर आता नवी मुंबई पोलिसांची (Navi Mumbai) सुद्धा पळापळ सुरू झाली आहे. आझाद मैदानात पहिल्यांदा मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी काही झालं तरी आझाद मैदानातच आंदोलन करणार अशी भूमिका घेत लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेनं कूच केलं आहे. त्यांच्यासोबत हजारो समर्थकांचा ताफा आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा पुणे पोलिसांप्रमाणे नवी मुंबई पोलीस सुद्धा लोणावळ्याच्या आसपास येऊन पोहोचले.
मुंबईमध्ये पोहोचून आरक्षणासाठी उपोषण करणारच
नवी मुंबई पोलिसांकडून मार्ग बदलण्यासाठी विनंती जरांगे पाटील यांना करण्यात आली. मात्र, मला या भागातील कोणतीच माहिती नसल्याचे सांगत कोणताच निर्णय दिला नाही. ते म्हणाले की, मार्ग कितीही बदलण्याचा प्रयत्न झाला तरी, आम्ही मुंबईकडे जाणारच असा निर्धार बोलून दाखवला. दरम्यान, आयोजक जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही मुंबईमध्ये पोहोचून आरक्षणासाठी उपोषण करणारच आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितले.
दहा किमीचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे यांना विनंती
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जात असलेल्या मार्गावर मोठे हॉस्पिटल असल्याने दहा किमीचा मार्ग बदलण्यासाठी मनोज जरांगे यांना विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी या भागात आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे सांगत चेंडू आयोजकांच्या कोर्टात ढकलला. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवी मुंबई पोलीस आयोजकांशी चर्चा करून कोणता मार्ग निवडतात याकडे आता लक्ष असेल.
दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या