(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adalrao Patil Vs Vilas Lande : विलास लांडेंची नाराजी दूर, शिवाजी आढळरावांचा दावा; लांडेंची मात्र चुप्पी कायम
अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे.
शिरुर, पुणे : अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) नाराज नाहीत, असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे (Shirur Loksabha Constituency) उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Adhalrao Patil) यांनी केला आहे. शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे ही इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्यापासून ते प्रचारात फारसे सक्रिय दिसले नाहीत. म्हणूनच कदाचित आढळरावांनी लांडेंची भेट घेतली. या भेटीनंतर आढळरावांनी लांडे नाराज नसल्याचं म्हटलंय.
उमेदवारी ज्यांना भेटेल त्याचा प्रचार करायचं, असं आमच्या दोघांमध्ये ठरलं होतं. त्यानुसार मला उमेदवारी मिळाल्यानं आता लांडे माझा प्रचार करतील, असा दावा आढळरावांनी केला. मात्र विलास लांडे अद्याप त्यांची भूमिका कॅमेऱ्यासमोर जाहीर करत नाही आहे. त्यामुळं ते आढळरावांचा प्रचार करणार का? हा प्रश्न कायम आहे.
काय म्हणाले आढळराव पाटील?
आढळराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे सहकारी विलास लांडे यांनी कधीही मला प्रवेशासाठी विरोध केला नाही. ते इच्छुक होते हे मान्य आहे. त्याच्यामध्ये काय गैर नाही पण जेव्हा आमच्या नेत्यांनी, अजित दादांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी प्रवेश आणि उमेदवारी मान्य केली होती. विलास लांडे नाराज असल्याच्या चर्चांना काहीही अर्थ नाही. ज्यावेळी नाराजीच्या बातम्या आल्या त्यावेळी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. त्यांच्या भागात आल्याने त्यांची भेट घेतली आहे. निवडणुकीचं नियोजन कसं करायचं?, प्रचाराचं नियोजन कसं करायचं?, या संदर्भात चर्चा झाली.
लांडेंची मात्र चुप्पी कायम!
आढळरावांनी जरी विलास लांडेंची नाराजी दूर झाल्याचं सांगत असले तरीही विलास लांडेंनी अजून यासंदर्भात काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. शिवाय त्यांनी माध्यमांशी बोलणंदेखील टाळलं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे विलास लांडेंची नाराजी खरंच दूर झालीये का?, यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयात उमेदवाराला साफ नापसंती दर्शवली होती. त्यासोबतच कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा नावासाठी पक्षाकडे मागणी केली जात होती. मात्र आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि अजित पवारांनी आढळराव पाटलांना विजयी करण्यासाठी आवाहन केलं. गेली 35 वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी 2009 साली लोकसभा लढलो आहे. 2019 ला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आले. मी 10 वर्ष आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे. माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असं विलास लांडे म्हणाले होते.
इतर महत्वाची बातमी-