होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही
मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा अद्यापही सुरू असून मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा ते उपोषणाला बसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसून येते. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या स्थळीच आपणही उपोषण करणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही अंतरवाली सराटीत घडलेल्या दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करताना आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेला होता, त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर रात्री दोन वाजता रोहित पवार (Rohit Pawar) आणि स्थानिक आमदार राजेश टोपे हे अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी आले आणि त्यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना पुन्हा त्याठिकाणी बसवले, असा दावा अजितदादा भुजबळ यांनी केला होता. आता, भुजबळ यांच्या दाव्यावर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे.
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का?, असा सवाल रोहित पवार यांनी दिला आहे. तसेच, आपण मध्यरात्री 2.30 वाजता तेथे गेलो होतो, असेही त्यांनी मान्य केले.
ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे यांच्यावर ‘ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे, असे चॅलेंजच रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांना दिलंय. तसेच, असो! हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या, तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, अशी विनंतही रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांना ट्विटरवरील पोस्टमधून केली आहे.
काय म्हणाले होते छगन भुजबळ
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माझ्या माहितीप्रमाणे अंतरवालीत ज्यावेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीमार झाला तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. परंतु, रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले. यानंतर तिकडे शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे हेदेखील तिकडे गेले. पवार आणि उद्धव साहेबांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती. आंदोलकांच्या दगडफेकीत 80 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांनी अंतरवाली सराटीत स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला, हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहिती नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले.
हेही वाचा
पुण्यातील गुंड गजा मारणेला रिल्स बनवणं पडलं महागात; पोहोचला थेट पोलीस ठाण्यात