Treason: राजद्रोह म्हणजे नेमकं काय? कधी दाखल केला जाऊ शकतो गुन्हा, जाणून घ्या
What Exactly Is Treason?: मागील तीन दिवसांपासून शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात हाय-व्होल्टेज राजकीय नाट्य सुरू आहे.
What Exactly Is Treason?: मागील तीन दिवसांपासून शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात हाय-व्होल्टेज राजकीय नाट्य सुरू आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण पासून सुरू झालेलं हे प्रकरण आता तुरुंगवारीपर्यंत येऊन पोहोचलं आहे. या तीन दिवसांत महाराष्ट्रात आणि मुंबईत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. याच दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्यावर 153 अ सोबतच 124 अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र हा राजद्रोहाचा गुन्हा नेमका काय आहे? तसेच एखाद्या व्यक्तीवर राजद्रोहाचा गुन्हा कधी दाखल केला जाऊ शकतो, याबाबत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
राजद्रोह म्हणजे नेमकं काय?
राजद्रोहाचा गुन्हा हा भारतीय दंड संहितेच्या 124 अ या कलमाखाली दाखल केला जातो. शासनाविरोधात विद्रोह, तिरस्कार अथवा विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणे. बोलण्याने, लिखाणाने चिन्हांचा वापर वापर करून विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणे, दृश्य हावभावाचा उपयोग करून विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्यास हा गुन्हा दाखल करण्यात येतो. राजद्रोह हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यात आरोपीला 3 वर्षांपासून ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.
153 अ कलम म्हणजे काय?
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना राजद्रोहाच्या कलमाखाली अटक झाल्यानंतर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाजू मांडताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''153 अ कलम म्हणजे चिथावणीखोर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण होईल,अशा प्रकारचं कृत्य करणे. अशा व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान कलम 153 अ नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यात जर पुरावे मिळून आरोप सिद्ध झाला तर अशा व्यक्तीस 3 वर्षांची किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते.''
महत्वाच्या बातम्या