वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते
मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन आरोपींच्या अटकेची व फाशीच्या शिक्षेची मागणी करत मोर्चे काढण्यात येत आहेत. बीड, परभणीनंतर पुणे शहरातही संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाषण करताना आमदार सुरेश धस यांनी बीडमधील नेते व मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhanajay Munde) गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरच खंडणीचा आकडा फायनल झाल्याचं धस यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांनी आरोप करताना थेट धनंजय मुंडेंचं नाव न घेता, आकाचे आका असं म्हटलं. त्यामुळे, सध्या आका आणि आकाचे आका हा शब्दप्रयोग राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. आमदार धस (Suresh dhas) यांनी आणखी एक शब्दप्रयोग केला आहे. विशेष म्हणजे हाही शब्दप्रयोग करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घेतलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादीत बडी मुन्नी आहे, ती अमोल मिटकरीला बोलायला लावते, असे म्हणत धस यांनी आणखी नेता त्यांच्यास्टाईलने कोड्यात ठेवला आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर, याप्रकरणी एसआयटी नेमण्यात येईल असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार, याप्रकरणी एसआयटी नेमण्यात आली असून सीआयडीकडून या खूनप्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण गाजत आहे. आमदार सुरेश धस यांनी सरपंच हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं. त्यावेळी, वाल्मिक कराडचा उल्लेख आका म्हणून ते करत. तर, वाल्मिक कराडचा वरदहस्त असलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडेंचा थेट उल्लेख करण्याऐवजी ते आकाचा आका.. असा उल्लेख करत. एका मुलाखतीमध्ये आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे असल्याचंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे, आका म्हणजे वाल्मिक कराड तर आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता, सुरेश धस यांनी बडी मुन्नी असा उल्लेख करत आणखी एका नेत्याकडे रोख दर्शवला आहे.
राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, सुरेश धस हेही आका असल्याचं मिटकरींनी म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी बडी मुन्नी हा शब्दप्रयोग केला. अमोल मिटकरी स्वत: बोलत नाही, त्याला बडी मुन्नी बोलायला लावत आहे. पण, मी बडी मुन्नीची सुन्नी करतो, असेही धस यांनी म्हटले. त्यामुळे, सुरेश धस यांनी बडी मुन्नी उल्लेख करत राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याकडे रोख धरला, लक्ष वेधले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण, अमोल मिटकरींना नेमकं कोणी बोलायला लावलं, मिटकरींना आरोप करायला कोणी लावलं याची चर्चा सुरू झाली. तसेच, राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत कोणत्या बड्या नेत्याकडे धस यांनी आपला मोर्चा वळवलाय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.