संजय कुटेंना पाहून विजय वडेट्टीवार म्हणाले, तुम्ही खुर्च्या उबवा,आम्ही प्रश्न सोडवतो
सध्या विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज चांगलेच वादळी ठरले. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्यामुळे या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.
मुंबई : सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) चालू आहे. आज अधिवेशनाचे कामकाच चांगलेच वादळी ठरले आहे. 9 जुलै रोजी मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी हजेरी लावली नाही. त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे विरोधकही चांगलेच संतापले आहेत. त्याची प्रचिती सभागृहाच्या बाहेरही आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधारी बाकावरील आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांना चांगलाच टोला लगावला.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब झाल्यानंतर वेगवेगळे नेते माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत होते. यावेळी विरोधी बाकावरील आमदार जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख आदी नेते उपस्थित होते. याच ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार संजय कुटे हेदेखील उपस्थित होते. वडेट्टीवार माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यासाठी जात होते. पण मध्येच त्यांच्यासमोर संजय कुटे आले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी हीच संधी साधत कुटे यांना खोचक टोला लगावला. "तुम्ही खुर्च्या उबवा,आम्ही प्रश्न सोडवतो" असं वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या टोलेबाजीमुळे काही काळासाठी हशा पिकला होता.
विधानपरिषदेत नेमकं काय घडलं?
विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले. परिणामी या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले. ओबीसी-मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीला विरोधक उपस्थित न राहिल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार गोंधळ करण्यात आला. तर या गोंधळामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. सत्ताधारी गोंधळ घालत असताना विरोधकदेखील उभे राहून गोंधळ घालत होते. विरोधकांकडून ओबीसी-मराठा आरक्षणाची बैठक विधिमंडळात का घेतली नाही? असा सवाल करत होते. सत्ताधारी आणि विरोधक यांचा वाढता गोंधळ पाहता उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून मार्शलला बोलवण्याचा आदेश देण्यात आला. तरीही गोंधळ वाढत गेल्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्याकडून विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधानसभेचे कामकाजही तहकूब
विधानसभेतही असीच स्थिती पाहायला मिळाली. शेवटची सत्ताधारी आणि विरोधक यांची आक्रमकता तसेच सभागृहातील गोंधळ लक्षात घेऊन विधानसभे कामकाजदेखील चौथ्यांदा 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
हेही वाचा :