(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची दांडी, बाळासाहेब थोरात, अंबादास दानवेंच्या सरकारला कानपिचक्या
विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आरक्षणासंदर्भात बैठक घेतली असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आम्हाला सरकारने दिलेल्या आश्वासनांची कल्पनाच नसल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
मराठा-ओबीसी आरक्षण प्रश्नावर सरकारने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मविआने दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैठकीत उपस्थित न राहिल्याविषयी तसेच आरक्षणप्रश्नी सरकारच्या निर्णयांविरोधात भाष्य करत कानपिचक्या काढल्या आहेत.
आरक्षणाबाबत सत्ताधारी राजकारण करतायत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वेगवेगळ्या भूमिका असून हे तीन तोंडाचे सरकार आहे असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. तर आम्ही बैठकीला गैरहजर राहून कुठल्याही प्रकारचे राजकारण केले नाही, सरकारनं नेमकं ओबीसी आणि मराठा समाजाला काय आश्वासन दिले हेच आम्हाला माहिती नसल्याने सर्वपक्षीय बैठकीला हजर राहण्याचा कारण नव्हतं, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
आम्हाला कळू द्या तुम्ही काय निर्णय घेताय?
सर्वपक्षीय बैठकीत सरकार आपलाच अजेंडा राबवत आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाला बोलतात, उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाला बोलतात. हे सगळे गुपचूप काय बोलतात? आम्हाला कळू द्या तुम्ही काय निर्णय घेताय. तुमचा निर्णय आम्हाला कळत नाही आणि आम्हाला बैठकीला बोलवता, असे म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारला सुनावले.
विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बैठक
सभागृह सुरू आहे. सभागृह सुरू असताना यावर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरक्षणासंदर्भात बैठक घेत आहात. आरक्षणासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये जी भूमिका मांडली तीच शिवसेनेची भूमिका आहे असेही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
सरकारने नेमके ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना काय आश्वासन दिले आहे, याची आम्हाला काहीच माहिती नाही. त्यामुळे या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहण्याचे कारण नव्हते. आम्ही बैठकीला गैरहजर राहून कुठल्याही प्रकारचे राजकारण केले नाही. असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं नाही तरी निवडून येऊ
आरक्षणासंदर्भात सकारात्मक तोडगा निघावा हीच आमची भूमिका आहे. काँग्रेसकडे एवढा पैसा नाही जे हॉटेलमध्ये आमदारांना ठेवतील. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते पक्ष आपल्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवत आहेत. आम्ही हॉटेलमध्ये जरी नाही ठेवलं तरी महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील. असे म्हणत थोरात यांनी सरकारचे कान पिळले.
विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटा फूट टाळण्याकरिता महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र ठेवले आहे. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला टोलावले.