मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ, विरोधक बैठकीला गैरहजर राहिल्यानं सत्ताधाऱ्यांचा संताप, विधानसभेचं कामकाज तहकूब
मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ झाला आहे. काल बोलावलेल्या बैठकीला विरोधक हजर न राहिल्यानं भाजप आमदार आशिष शेलार आणि अमित साटम यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
Maharashtra Legislature Monsoon Session : मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ सुरु आहे. भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार अमित साटम यांनी काल बैठकीला न आल्यामुळे विरोधकांवर टीका केली आहे. त्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधीपक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपली भूमिका काय? विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे, अमित साटम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गोंधळामुळं सभागृहाच कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावरुन विरोधकांना तेढ निर्माण करायची आहे. जनतेने आणि मनोज जरांगे पाटील यांनी पाहावं की विरोधी पक्षाची भूमिका काय आहे. माझं त्यांना आवाहन आहे त्यांनी हे राजकारण पाहावं असेही अमित साटम म्हणाले.
यांचा सभागृहाबाहेरील बोलवता धनी कोण? आशिष शेलारांचा सवाल
जेव्हा विरोधकांना बोलवलं तेव्हा बैठकीसाठी आले नाहीत. बाहेर वेगळं नाटक करता आणि नंतर चर्चेला येत नाही असे म्हणत आजप आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ऐनवेळी कुणाचा फोन आणि मेसेज येतो की, अचानक बैठकीला येत नाहीत. यांचा सभागृहाबाहेरील बोलवता धनी कोण? खरं काय ते समोर आलं पाहिजे. याचं समाजाला उत्तर हवं असल्याचे आशिष शेलार म्हणाले.
बैठकीला उपस्थित राहू नका या संदर्भात विरोधकांना कोणाचा फोन आला? : संजय कुटे
कालच्या बैठकीला उपस्थित राहू नका या संदर्भात विरोधकांना कोणाचा फोन आला? असा सवाल भाजप आमदार संजय कुटे यांनी केला आहे. याआधीही विरोधी पक्ष बैठकीला उपस्थित होते. मग काल काय झालं? राष्ट्रवादीचे मोठे नेते त्यावेळी काय बोलले होते. यांची भुमिका दुतोंडी असल्याचे कुटे म्हणाले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं का? या संदर्भात त्यांनी भुमिका घ्यावी. समाजासामाजात भांडण लावली जात असल्याचे कुटे म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकिबाबत अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण नव्हते
सर्वपक्षीय बैठकिबाबत अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण नव्हते. याबाबत संभ्रम होता असे मत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलं. आम्हाला व्यवस्थित पूर्व कल्पना दिली असती तर आलो असतो. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. आमदारांना हाॅटेलमध्ये ठेवले जाणार आहे. याबाबत अद्याप कल्पना नाही असे कदम म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
विधानपरिषदेच्या सभापतींची निवड याच अधिवेशनात? राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्नही सुटणार? फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट