विजय शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम! थेट आकडेवारी सांगत मांडलं विजयाचं गणित; अजित पवारांची डोकेदुखी वाढणार!
एकनाथ शिंदे गटातील नेते विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. हा निश्चय त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला.
पुणे : बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) ठाम आहेत. त्यांचा बंडखोरीचा पवित्रा हा बारामतीत (Baramati) महायुतीसाठी चांगलीच डोकेदुखी ठरतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विजय शिवतारेंची समजूत काढण्याचा याआधी प्रयत्न केलेला आहे. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी 'एपीपी माझा'शी बातचित करत आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी थेट विजयाचं गणित सांगितलं आहे.
'5 लाख 50 हजार मतदार हे पवारांचा विरोध करतात'
विजय शिवतारे यांचा बंडाचा पवित्रा अद्याप कायम आहे. त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. ते 20 मार्च रोजी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असून तेथील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. ते आमदार संग्राम थोपटे यांच्या कुटुंबीयांचीही ते भेट घेणार आहेत. दरम्यान एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, मी बंड केलेलं नाही. एक लक्षात घ्या मी पुन्हा-पुन्हा सांगतोय की 6 लाख 86 हजार मतदार पवारांचे समर्थन करतात. तर 5 लाख 50 हजार मतदार हे पवारांचा विरोध करतात. पवार घरण्याचे समर्थन करणारे मतदार हे नणंद आणि भावजई यांना मतदान करतील. पण पवार घराण्याच्या विरोधात असणारे मतदार कोणाला मतदान करतील.
"...म्हणून मी ही जागा लढवतोय"
"पवार कुटुंबाच्या विरोधात असणारे सर्व लोक माझ्याकडे आले होते. हे लोक मला सांगत होते की, आम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनाही द्यायचे नाही. मग आम्ही मतदान कोणाला द्यायचे, असे ते विचारत होते. म्हणूनच मी बंड केलेलं नाही. मी माझं कर्तव्य केलं आहे. पवार परिवाराला कंटाळेल्या लोकांना योग्य संधी देण्यासाठी मी ही जागा लढवतोय. मी माझं लोकशाहीतील कर्तव्य करतोय," असेदेखील शिवतारे यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या एका महिन्यापासून मी लोकांच्या संपर्कात होतो. मी आज भोरला जातोय. मी ग्रामदेवतचं दर्शन घेणार आहे. मी भोर तालुक्याचे सुपुत्र अनंतराव थोपटे यांच्या भेटीला मी जातोय. भोर आणि थोपटे यांची काय अवस्था झाली आहे, अशी टीकाही विजय शिवतारे यांनी केली.
"अजित पवार जिंकू शकणार नाहीत, हे त्रिवार सत्य"
मुख्यंत्री मला सांगत आहेत की आपण युती धर्म पाळला पाहिजे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे नेते अमित शाह यांना शब्द दिला आहे. एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे युतीचा खासदार निवडून आला पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. प्रत्येक जागेवर युतीचा विजय झाला पाहिजे, असंच माझंही मत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करतो. मात्र बारामतीची परिस्थिती वेगळी आहे. बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे, असा दावा शिवतारे यांनी केला. तसेच पवार विरोधकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असेल तर मी ती संधी का सोडावी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.