विधानसभेची खडाजंगी: सोलापुरात 11 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
कधी काळी गिरणगाव असलेला सोलापूर हा अलिकडे साखर उत्पादक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 35 साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे विशेष लक्ष असलेला जिल्हा आणि राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जात. स्वत: शरद पवारांनी मंत्री झाल्यानंतर याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. तर, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोलापूरचे पालकमंत्रीपद सांभाळले आहे. त्यामुळे, सोलापूर जिल्ह्यावर शरद पवारांची विशेष मर्जी राहिली आहे. मात्र, 2018 नंतर राज्यातील राजकारण बदललं, मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश, बार्शीच्या सोपल यांनी सोडलेली साथ आणि स्थानिक बदलांमुळे राष्ट्रवादीचा सोलापूरातील बुरज ढासळल्याचं दिसून आलं. जिल्ह्यावर भाजपने (BJP) पकड मजबूत केली. आता, पुन्हा तोच बालेकिल्ला शाबूत करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. मात्र, स्वत:चाच पुतण्या आता शरद पवारांविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे, येथेही राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. आगामी विधानसभा (vidhansabha) निवडणुकांचा विचार केल्यास 11 विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होणार असल्याचे दिसून येते.
कधी काळी गिरणगाव असलेला सोलापूर हा अलिकडे साखर उत्पादक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 35 साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे, सहकार क्षेत्राशी संलग्नित येथील राजकारण राहिलं आहे. त्यामुळे, सहकारी संस्था, दूध संघ, जिल्हा बँक यांच्याभोवती येथील राजकारण फिरतं. मात्र, जिल्ह्यात अनेकदा उजनीच्या पाण्याचा प्रश्नही महत्वाचा राहिला आहे. आपल्या मतदारसंघात उजनीचं पाणी नेण्यासाठी आमदारांचं शीतयुद्धही जिल्ह्याने पाहिलं आहे. यासह, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या बा विठ्ठलाचा हा जिल्हा. त्यामुळे, पंढरीच्या विकासाच्या दृष्टीनेही जिल्ह्यास धार्मिक पर्यटन म्हणून नावलौकिक आहे. राज्य सरकारच्या विकास अजेंड्यावर हा जिल्हा असतो. मात्र, गत काही वर्षात येथील तरुणाईचं स्थलांतर हाही येथील गंभीर प्रश्न बनला आहे. नोकरी व रोजगाराच्या शोधत येथील तरुणाईने पुणे-मुंबईची वाट धरली आहे.
सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार?
नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागेवर भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे, भाजपने आता विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत अपक्ष असूनही तेही भाजपसोबतच राहिले आहेत. त्यामुळे, 11 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद आहे. तर, सांगोल्यात शिवसेना हाही महायुतीचा घटक असल्याने 7 मतदारसंघात भाजप महायुतीचे वर्चस्व दिसून येते. 2 मतदारसंघात राष्ट्रवादी, करमाळ्यातील अपक्ष आमदारांचाही राष्ट्रवादीला पाठिंबा, त्यामुळे 3 मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे. जिल्ह्यात अनुक्रमे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस असं संख्याबळ दिसून येतं.
आमदारांची यादी
सांगोला - शहाजी बापू पाटील (शिवसेना शिंदेगट)
माळशिरस - राम सातपुते (भाजप)
करमाळा - संजय शिंदे (अपक्ष)
माढा - बबन शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार)
मोहोळ - यशवंत माने (राष्ट्रवादी अजित पवार)
द. सोलापूर - सुभाष देशमुख (भाजप)
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
पंढरपूर-मंगळवेढा - समाधान अवताडे (भाजप)
शहर उत्तर - विजयकुमार देशमुख (भाजप)
शहर मध्य - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
बार्शी - राजेंद्र राऊत (अपक्ष)
विधानसभानिहाय 2019 मधील लढती आणि मताधिक्य
1. सांगोला : शिवसेनेचे उमेदवार असलेल्या शहाजी पाटील (शिवसेना) विरुद्ध अनिकेत देशमुख (शेकाप) यांच्यात थेट लढत झाली. त्यामध्ये, शहाजी बापू पाटील 786 मतांनी विजयी झाले आहेत.
2. माळशिरस : भाजप उमेदवार राम सातपुते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तमराव जानकर यांच्यात थेट लढत झाली. त्यामध्ये, राम सातपुते 2,590 मतांनी विजयी झाले आहेत. यंदा उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार मानले जातात.
3. करमाळा : संजय शिंदे विरूद्ध नारायण पाटील (दोन्ही अपक्ष) व रश्मी बागल (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत झाली होती. मात्र, अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी 5,494 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांना समर्थन दिलं. सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर, रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे, यंदाही येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
4. माढा : बबनराव शिंदे (राष्ट्रवादी) विरुद्ध संजय कोकाटे (शिवसेना) : शिंदे 68 हजारांहून अधिक मतांनी विजयी
5. मोहोळ : यशवंत माने (राष्ट्रवादी) विरुद्ध नागनाथ क्षीरसागर (भाजप) : माने 21,699 मतांनी विजयी
6. दक्षिण सोलापूर : सुभाष देशमुख (भाजप) विरुद्ध बाबा मिस्री (काँग्रेस) अशी लढत झाली. मात्र, सुभाष देशमुख 29,247 मतांनी विजयी झाले
7. अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (भाजप) विरुद्ध सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस) अशी लढत झाली होती. त्यामध्ये, कल्याणशेट्टी 36,769 मतांनी विजयी झाले. भाजप आमदार असलेल्या कल्याणशेट्टी यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपलं पारड जड केलं आहे.
8. पंढरपूर-मंगळवेढा : समाधान आवताडे (भाजप) विरुद्ध भगिरथ भालके (राष्ट्रवादी) अशी लढत झाली. येथे समाधान आवताडे यांनी 3,733 मतांनी विजयी विजय मिळवला. मात्र, यंदाच्या विधानसभेला भाजपसाठी ही निवडणूक सोपी वाटत नाही. लोकसभेमुळे येथील चित्र बदलल्याचे दिसून येते. अभिजित पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.
9. शहर उत्तर : विजयकुमार देशमुख (भाजप) विरुद्ध आनंद चंदनशिवे (‘वंचित’), मनोहर सपाटे (राष्ट्रवादी) : देशमुख 77,324 मतांनी विजयी
10. शहर मध्य : येथील मतदारसंघात प्रणिती शिंदे (काँग्रेस), फारुख शाब्दी (एमआयएम), नरसय्या आडम (माकप), दिलीप माने (शिवसेना), महेश कोठे (अपक्ष) अशी बहुरंगी लढत झाली होती. मात्र, यंदा प्रणिती शिंदे खासदार बनून दिल्लीला गेल्याने येथील मतदारसंघात नवा चेहरा कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, माकपच्या नरसय्य आडम यांनी या जागेवर दावा केला असून महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांचीही भेट घेतली आहे.
11. बार्शी : येथील मतदारसंघात 2019 साली राजेंद्र राऊत (अपक्ष) विरुद्ध दिलीप सोपल (शिवसेना) आणि निरंजन भूमकर (राष्ट्रवादी) अशी तिरंगी लढत झाली. त्यामध्ये, राजेंद्र राऊत 3076 मतांनी विजयी झाले. यंदाही येथील मतदारसंघात राऊत विरुद्ध सोपल असाच सामना रंगणार आहे. आमदार राऊत हे भाजपकडून उमेदवार निश्चित मानले जातात. मात्र, दिलीप सोपल हे जरी ठाकरेंच्या शिवसेनेत असले तरी, त्यांनी स्वतःसाठी सर्वच पर्याय खुले ठेवले आहेत. लोकसभा निवडणुकीत, इथे मीच एक पक्ष आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेना पक्षातील नाराजी अप्रत्यक्षपणे उघड केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी आजारी असतानाही सभा गाजवली होती.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांमधील निकालाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 8 मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे, भाजप-सेना युतीचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 असे एकूण 10 आमदार सोबत असतानाही महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याने जिल्ह्याचं राजकारण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वेगळ्याच वळणावर असल्याचं दिसून येत आहे.
पक्षातील फुटीमुळे जागावाटपात बदललं गणितं
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये थेट लढत होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद् महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. या लढतीत शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात मोठा तिढा निर्माण होणार आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 11 विधानसभा निवडणुकांचं जागावाटप करताना तिन्ही पक्षांपुढे अडचणी निर्माण होणार आहेत.
2019 च्या तुलनेत महाविकास आघाडीचं जागावाटप
गत 2019 वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या सर्व जागा यंदा महाविकास आघाडीत शरद पवार गट लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसकडे अक्कलकोट, शहर मध्य आणि शहर दक्षिणची जागा असणार आहे. सांगोल्याची जागा शेकापसाठी महाआघाडीतून सोडावी लागेल. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या शिवेसेनेला एकमेव बार्शीची जागा मिळू शकते. मात्र, शिवसेना महाविकास आघाडीच्या ओमराजे यांच्यासाठी प्रचार करताना, मी स्वत:च नेता आहे, असे म्हणत सोपल यांनी सर्वच पर्याय खुले असल्याचे सूचवले आहे. त्यामुळे, सोपलांच्या भूमिकेनंतरच शिवसेना या जागेवर दावा करू शकेल असेच चित्र आहे.
2019 च्या तुलनेत महायुतीचं जागावाटप
गत 2019 ला भाजप सेना युतीमधून शिवसेनेने शहर मध्य, करमाळा, माढा, सांगोला, मोहोळ आणि बार्शी या 6 जागा लढवल्या होत्या. तर, भाजपने उर्वरीत 5 जागा लढवल्या होत्या. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 जागांवर भाजपचे आमदार आहेत, तर बार्शीच्या आमदारांचा भाजपला पाठिंबाआहे. त्यामुळे, विद्यमान 6 जागा भाजप लढवू शकते. सांगोल्याची जागा शिंदेच्या शिवसेनेला जाईल. तर, शिवसेनेकडे असलेल्या करमाळा, माढा, मोहोळ या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा राहण्याची दाट शक्यता आहे. राहिलेल्या सोलापूर शहर मध्यच्या जागेवरुन महायुतीतही रस्सीखेंच होताना पाहायला मिळेल.