माझ्या नाराजीवर उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील, मला जे हवंय ते मी माझ्या पक्षात भांडून घेणार : बबनराव घोलप
Babanrao Gholap : "माझ्या नाराजीवर उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील, मला जे हवंय ते मी माझ्या पक्षात भांडून घेणार, मला इकडे तिकडे जायची गरज नाही, असं बबनराव घोलप म्हणाले.
![माझ्या नाराजीवर उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील, मला जे हवंय ते मी माझ्या पक्षात भांडून घेणार : बबनराव घोलप Uddhav Thackeray will take a decision on my displeasure in two days I will fight for what I want in my party says Babanrao Gholap माझ्या नाराजीवर उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील, मला जे हवंय ते मी माझ्या पक्षात भांडून घेणार : बबनराव घोलप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/055976d42bc3b3902e18887250590266169433613218983_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : "माझ्या नाराजीवर उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील, मला जे हवंय ते मी माझ्या पक्षात भांडून घेणार, मला इकडे तिकडे जायची गरज नाही, असं बबनराव घोलप (Babanrao Gholap) म्हणाले. तसंच सध्यातरी माझा राजीनामा तसाच ठेवला आहे," असंही त्यांनी सांगितलं. बबनराव घोलप एबीपी माझाशी बोलत होते.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा ठाकरे गटात प्रवेश झाल्यानंतर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वाकचौरे यांच्या उमेदवाराची चर्चा सुरु झाल्यानंतर बबनराव घोलप हे अस्वस्थ होते. जर वाकचौरेंना उमेदवारी द्यायची होती तर मला का आश्वासन दिले? माझं संपर्क प्रमुखपद का काढून घेण्यात आलं? शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यासंदर्भात मला का कळवण्यात आलं नाही असे सवाल विचारत घोलप यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. या सगळ्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बबनराव घोलप यांना बोलावलं आहे. त्यानंतर बबनराव घोलप यांनी एबीपी माझाशी संवाद साधला
"जो काही प्रकार आमच्या पक्षात घडला आहे तो तुम्ही काल पत्रकार परिषदेत ऐकला. संजय राऊत यांना हे सगळं जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे मी त्यांना सगळी माहिती दिली. संजय राऊत यांनी मला सांगितलं की मी दोन दिवसात उद्धव ठाकरेंना या सगळ्या संदर्भात बोलतो आणि योग्य काय तो निर्णय होईल. त्यामुळे सध्या तरी माझा राजीनामा तसाच ठेवला आहे," असं बबनराव घोलप म्हणाले.
'वाकचौरेंना उमेदवारी द्यायची होती तर मला आश्वासन का?'
भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी द्यायची होती तर त्यांना ती आधीच द्यायला हवी होती, मला का आश्वासन दिलं? मला हो म्हणत त्यांना उमेदवारी का दिली? असे प्रश्न विचारत मला उमेदवारी दिली नसती तरी चाललं असतं, असं बबनराव घोलप म्हणाले. भाऊसाहेब वाकचौरे यांना मीच शिवसेनेत आणलं. त्यांना मीच उमेदवारी दिली होती. पण ते गद्दार निघाले, त्यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर भाजपमध्ये गेले, असं सांगत तुम्हाला शिवसेनेत माणसं ठेवायची आहेत का? असा सवाल देखील घोलप यांनी विचारला.
'काय हवंय ते मी पक्षात भांडून घेईन'
आम्ही 55 वर्ष शिवसेनेत काम करतोय. माझं जे काही म्हणणं आहे ते संजय राऊत यांना सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मला दुसऱ्या पक्षात जायची गरज नाही. मी 55 वर्षे शिवसेनेत आहे. मला जे काय हवं आहे ते मी माझ्या पक्षात भांडून घेईन, मला इकडे तिकडे जायची गरज नाही. जर-तर बरं मी बोलणार नाही मला जे हवे ते मी मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)