![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Shivsena : राजीनाम्यानंतर माजी आमदार बबनराव घोलप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी शिवसैनिक म्हणून...
Nashik Shiv Sena : शिवसेनेचे पाच वेळेसचे आमदार बबनराव घोलप यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
![Nashik Shivsena : राजीनाम्यानंतर माजी आमदार बबनराव घोलप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी शिवसैनिक म्हणून... Nashik latest News First reaction of former MLA Babanrao Gholap after resignation from Shiv Sena UBT faction Maharashtra Politics Nashik Shivsena : राजीनाम्यानंतर माजी आमदार बबनराव घोलप यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी शिवसैनिक म्हणून...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/10/d16fb63626dd9e0c1c03092ca1c264f81694345679708738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : 'स्वतःच्या हातांनी राजीनामा लिहिला आणि उद्धव ठाकरे यांना व्हाट्सअपवर पाठवला. व्हाट्सअपद्वारे (Whatsapp) सांगितले की, मी शिवसैनिक म्हणून काम करायला तयार आहे, अशा प्रकारचे षडयंत्र होत असल्यास मला कुठल्याही पद नको, असेही व्हाट्सअप मेसेजमध्ये नमूद केल्याचे बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी सांगितले. उद्या मुंबईत संजय राऊत यांची भेट घेणार असून माझं काही चुकलं का? असंही विचारणार असल्याचे घोलप म्हणाले.
आज उद्धव ठाकरे (Udhhva Thackeray) जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेनेचा महत्वपूर्ण शिलेदार माजी आमदार बबनराव घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली. गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याने राजीनामा दिल्याने राजकीय चर्चाना उधाण आले. या पार्श्वभूमीवर बबनराव घोलप यांनी राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. घोलप म्हणाले, भाऊसाहेब वाघचौरे शिवसेनेत होते, मात्र त्यांनी शिवसेनेत (Shivsena) असताना अनेकदा शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून शिवसैनिकांना तुरुंगात डांबलं. कालांतराने वाकचौरे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी बोलवलं. त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, त्यानंतर दोनच दिवसांत मला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पद देण्यात आले. त्यानंतर गेल्या सात-आठ महिन्यांपासून शिर्डी लोकसभा मतदार संघात संपर्कप्रमुख म्हणून मी काम पाहतो आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी शाखा देखील ओपन केल्या. मात्र अशातच पुन्हा एकदा भाऊसाहेब वाघचौरे यांना पक्षाने सामील करून घेतलं, हे काही पटलं नाही.
दरम्यान हे सर्व सुरू असतानाच उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांचा दौरा आला, मात्र या दौऱ्याबाबत मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती, तसेच जिल्हाप्रमुखांना देखील कल्पना नव्हती. दुष्काळी दौऱ्या असल्याने आम्ही याबाबत काहीही बोललो नाही, दुष्काळ दौरा सुरू असताना उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा बोलत होते, तेव्हा तेव्हा मिलिंद नार्वेकर भाऊसाहेब वाकचौरेंना पुढे करत होते. त्यावेळी थोडं खटकलं आणि दुसऱ्या दिवशी सामनामधून थेट शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा संपर्कप्रमुख बदलल्याचं समजलं, माझ्या ऐवजी दुसरा संपर्कप्रमुख नेमल्याच देखील दिसून आलं. त्यामुळे अशा सगळ्या घडामोडीतून मी माझ्या उपनेते पदाचा राजीनामा दिल्याचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी सांगितले.
तसेच स्वतःच्या हातांनी राजीनामा लिहिला आणि उद्धव ठाकरे यांना व्हाट्सअपवर पाठवला. व्हाट्सअप द्वारे सांगितले की, मी शिवसैनिक म्हणून काम करायला तयार आहे, अशा प्रकारचे षडयंत्र होत असल्यास मला कुठल्याही पद नको, असेही व्हाट्सअप मेसेज मध्ये नमूद केल्याचे बबनराव घोलप यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा बघितला असून त्यांनी तो संजय राऊत यांना पाठवला आहे. संजय राऊत यांनी देखील मला फोन द्वारे संपर्क करत 'तुम्ही कसा राजीनामा दिला, काय झालं, आपण त्यावर चर्चा करू, मुंबईत या आपण बोलू' असेही संजय राऊत म्हणाल्याचे बबनराव घोलप यांनी सांगितले. त्यानुसार मी उद्या मुंबईत जाणार असून नेमकं यामागे काय षडयंत्र आहे, हे समजणे आवश्यक आहे. माझं काही चुकलं आहे का? हे देखील समजणं महत्त्वाचं आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते माझ्या शाखेचे उदघाटन
गेल्या 55 वर्षांपासून शिवसेनेत काम करत असून माझ्या शाखेचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1968 ला केलेले आहे. 1982 ला अहमदनगरच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन मी केले आहे. औरंगाबादच्या शाखेचे उद्घाटन मी केलेले असून चंद्रकांत खैरे त्यावेळी नोकरी करत होते. या उत्तर महाराष्ट्राचं काम आम्ही मोटरसायकलवर, टॅक्सीने गावोगावी जाऊन केलेले आहे. त्यामुळे आमच्या रक्तारक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहे, म्हणून आता जर आम्हाला मजबूर करून शिवसेना सोडायला लावणार असेल तर त्यांनी आम्हाला काढून टाकावे, अन्यथा आम्ही तसे जाणार नाही. त्यांनी आमची हकालपट्टी केली तर आमचा विचार दुसरा असेल अन्यथा आमचा विचार शिवसेना एके शिवसेना शेवटपर्यंत असेल, असेही बबनराव घोलप यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)