(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar : 'जगदंबा' तलवार तर येईल, पण गेलेले उद्योगही परत आणा; मुनगंटीवारांना वडेट्टीवारांचा सल्ला
जे कुणाला जमले नाही, त्यासाठी मुनगंटीवार प्रयत्न करत आहेत. याचा आनंद आहे. मात्र महाराजांच्या तलवारीसोबत राज्याबाहेर गेलेले उद्योगही परत आणा, असे माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराज यांची 'जगदंबा' तलवार महाराष्ट्रात आणण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. गेली 21 वर्षे जे कुणाला जमले नाही, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, याचाही मनस्वी आनंद आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग गेले, त्यामुळे हजारो राज्यातील तरुणांचे नुकसान झाले आहे. राज्याचेही प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. आता त्यांनी महाराजांच्या तलवारीसोबत राज्याबाहेर गेलेले उद्योगही परत आणा, असा सल्ला माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिला.
शिवाजी महाराजांची तलवार परत आणून राज्यातील जनतेची अस्मिता जपली जाणार आहेच. पण सोबतच राज्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देणारे उद्योग महाराष्ट्रात आणावे लागणार आहेत. पण त्याकडे लक्ष न देता तलवार परत आणण्यासारखे उद्योग करून सत्ताधारी बेरोजगारांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार सत्ताधारी करीत आहेत. राज्यातील तरुणांना आता हे कळून चुकले आहे. त्यामुळे महाराजांच्या जगदंबा तलवारीसोबत त्यांनी महाराष्ट्रात उद्योगही आणावे. तेव्हाच लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील, असे आमदार वडेट्टीवार म्हणाले.
केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी जगदंबा तलवार परत आणू नये, तर तलवारीसोबतच बेरोजगारांच्या हाताला रोजगार देणारे उद्योगही आणून समुद्धीही आणावी, अशी मागणी त्यांनी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला चिमटे काढले आहेत. तलवारी इतकाच महत्वाचा प्रश्न येथील बेरोजगारांचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर आता मंत्री मुनगंटीवार यांच्याकडून काय उत्तर येते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय म्हणाले होते मुनगंटीवार...
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या लढायांमध्ये अनेक तलवारी वापरल्या. त्यातील एक जगदंबा ही तलवार तेव्हाचे प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आले असताना छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) यांनी त्यांना भेट दिली होती. ती तलवार आता पुन्हा आमच्या राजांच्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. जेव्हा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले, त्यानंतर आम्ही महाराजांची तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे आणि त्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची विजयादशमीच्या पूजेची जी तलवार होती, ती रत्नजडित, हिरेजडित जगदंबा तलवार आता इंग्लंडच्या राणीच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये ठेवण्यात आली आहे. ही तलवार भारतात परत आणावी अशी तमाम जनतेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.