खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
आम्ही दिलेली तक्रार न घेता तिसऱ्याच व्यक्तीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यात आम्ही फक्त साक्षीदार आहोत हा काय प्रकार चाललायं. हे वेळीच थांबायला हवं, आता तर बाहेरून आमच्यावर दबाव टाकत आहे, असे देखील भरत शाह म्हणाले.
मुंबई: उत्तर पश्चिम लोकसभा (Mumbai North West Lok Sabha) मतदार संघाच्या मतमोजणीवेळी मोठा गैरप्रकार झाला असल्याचा आरोप हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केला आहे. मत मोजणीवेळी मोबाइल नेण्यास परवानगी नसताना वायकर यांचे मेव्हणे व मुलगी सतत फोनवर संपर्कात होते. आम्ही आक्षेप घेतला तो मोबाइल ताब्यत घेण्याची विनंती पोलिसांना केली. मात्र पोलिस आमच्या बोलण्याला गांभीर्याने घत नव्हते. तो फोनही बदलला असावा असा आम्हाला संशय आहे. इतकच काय तर आमची तक्रार न नोंदवता तहशीलदार यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालाच कसा? तक्रारीत पोलिसांनी वायकर यांच्या मुलीचं नावही घेतलेलं नसून पोलिस कुणाच्या दबावात काम करत आहेत असा सवाल शाह यांनी उपस्थित केला आहे.
भरत शाह म्हणाले, 4 जून रोजी रविंद्र वायकर यांची मुलगी प्रज्ञा व मेहुणा पंडिलकर मतमोजणी केंद्रात फोनवर बोलत होते. मी त्यावर आक्षेप घेतला. त्या दोघांना घेऊन मी आरो मॅडम यांच्याकडे तक्रार केली. त्यानी पोलिसांकडे जाण्यास सांगितले. तीन तासानंतर आम्ही पोलिसांकडे गेलो. मात्र सध्याच्या गुन्ह्यात वायकर यांच्या मेहुण्याचे नाव आहे मात्र मुलीचं नाव कुठेही नाही.तो फोन कोणाचा आहे हे माहीत नाही. मात्र त्यावर फोन वायकर यांचा येत होता. आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. पोलिसांनाही आम्ही कल्पना दिली. मात्र पोलिसांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पोलिस तक्रार घ्यायला तयार नव्हते. आम्ही दिलेला जबाबही त्यांनी घेतलेला नाही. दोघंही फोन वापरत असताना तक्रारीत फक्त एकाचंच नाव टाकले आहे.
पोलिसांनी त्या फोनचा सीडीआर काढावा : भरत शाह
भरत शाह पुढे म्हणाले, पाच तास बसवलं पण तक्रार नाही घेतली. आता 10 दिवसात आम्ही विविध ठिकाणी दाद मागितली. जे पोलिस तक्रार नोंदवायला होते, ते अचानक सुट्टीवर कसे काय जाऊ शकतात. 10 दिवसानंतर आमच्या ऐवजी तक्रारदार तहशीलदार कसे काय झाले. वायकरांचा फोन त्या नंबरवर येत होता हे आम्ही पाहिलयं, सीसीटिव्ही मागितले तेही दिलेले नाही. पोलिसांनी त्या फोनचा सीडीआर काढावा. कोणाचा फोन होता, कोणकोणाच्या संपर्कात होते.
या प्रकरणाचे फक्त आम्हीच साक्षीदार, बाहेरून आमच्यावर दबाव : भरत शाह
आम्ही दिलेली तक्रार न घेता तिसऱ्याच व्यक्तीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यात आम्ही फक्त साक्षीदार आहोत हा काय प्रकार चाललायं. हे वेळीच थांबायला हवं, आता तर बाहेरून आमच्यावर दबाव टाकत आहे, असे देखील भरत शाह म्हणाले.