(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Sena-VBA Alliance : राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांकडून युतीची घोषणा
Shiv Sena-VBA Alliance : राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडर यांनी आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे.
Shiv Sena-VBA Alliance : राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज (23 जानेवारी) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त आज या युतीची घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई, संजय राऊत, अरविंद सावंत तर वंचित बहुजन आघाडीकडून रेखाताई ठाकूर, अबुल खान उपस्थित होते.
'देश प्रथम' याचा विचार करुन पुढे जाणार : उद्धव ठाकरे
"आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस आहे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल एकत्र घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन 'देश प्रथम' याचा विचार करुन पुढे जाणार आहोत. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊच," अशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
"आम्हाला जेव्हा वाटलं फसवणुकीचा राजकारण होतंय तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत गेलो आणि मविआ सरकार यशस्वीपणे चालवलं. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली, तुम्हाला सोबत घ्यायला कोणाची ना नाही. आमचं असं ठरलं की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या मित्रपक्षाला आणायचं आणि मित्रपक्षांसोबत हित सांभाळायचं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोणी कुठल्या जागा लढवायच्या वेळ आलेली आहे. वेळ आल्यावर जागा लढवायचा निर्णय होईल, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतील जागा वाटपाच्या प्रश्नावर दिलं. तसंच हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या, असं आव्हान त्यांनी दिलं.
शरद पवार आमच्यासोबत येतील अशी आशा मी बाळगतो : प्रकाश आंबेडकर
निवडणुकीमध्ये एक बदल्याचं राजकारण सुरु होईल. आम्ही जी चळवळ सुरु केली. त्याला आमच्याच मित्र पक्षांनी गिळंकृत करण्याचा किंवा छोटा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना बाजूला करुन चळवळ सुरु ठेवली. भांडवलशाही, लुटारुंची सत्ता सुरु झाली आहे. दाओसला जाऊन उद्योग येतात हे मी कधी पाहिलं नाही, फक्त करार होतात. आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार आहे, त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे. फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आमचं काम आहे, असं त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात. प्रादेशिक पक्षांचा लीडरशिप तयार करण्याचा प्रयत्न असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे. याबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली. ते आमच्यासोबत येतील अशी आशा मी बाळगतो. आमची भांडणं जुनी आहे, शेतातली नाही. आता फक्त आम्ही दोघेच एकत्र आलो आहोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा आमच्यासोबत एकत्र येतील."
VIDEO : Shivsena Vanchit Alliance : लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत : Uddhav Thackeray