(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजितदादांविरोधात घरातील व्यक्तीला उभं करणार का? शरद पवार म्हणाले...
Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभेला जसा कुटुंबातील उमेदवार अजितदादांनी दिला, विधानसभेला शरद पवार अजित पवारांविरोधात डाव टाकणार? खुद्द शरद पवारांनीच सांगितला खास प्लान...
Sharad Pawar vs Ajit Pawar : मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थोरल्या पवार (Sharad Pawar News) यांची साथ सोडून भाजपप्रणित महायुतीसोबत (Mahayuti) गाठ बांधली. बारामतीतून (Baramati Lok Sabha Election 2024) शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना (Supriy Sule) उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण महायुतीकडून कोण? अशा चर्चा रंगलेल्या. अशातच महायुतीनं मोठा डाव टाकत बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरवलं. त्यामुळे बारामतीतील नणंद-भावजयांमध्ये रंगलेली लढत चर्चेचा विषय ठरली. पण या लढतीवर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. खास करुन खुद्द पवार कुटुंबियातील अनेकांना अजित पवारांचा निर्णय काही पटला नाही. बारामतीत कुटुंबाविरोधातला उमेदवार द्यायला नको होता, असं कुटुंबातील अनेकांचं म्हणणं होतं. अशातच आता लोकसभेसोबतच आगामी विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा रंगल्या आहेत. यावर आता शरद पवारांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे.
महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
बारामतीत कुटुंबाविरोधातला उमेदवार द्यायला नको होता, अशी चर्चा कुटुंबातील व्यक्तींनीही व्यक्त केली. पण आता विधानसभेला अजित पवारांविरोधात तुमच्याकडून कुटुंबातीलच उमेदवार दिला जाऊ शकतो का? या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "आज नाही सांगता येणार बघुयात आता वेळ आहे अजून सगळ्याला... एकंदरीत निवडणुकीचं चित्र काय होतंय...? एकंदरीत देशात सत्ता कुणाची येतेय... महाराष्ट्रातील काय स्थिती असेल? उद्या संपूर्ण महाराष्ट्रात भाजप येऊ नये, असं आमच्या सर्वांचं एकमत असेल, तर त्याला सोयीचे निर्णय सर्व मतदारसंघांमध्ये घेतले जातील. त्याबाबत आजच सांगता येणार नाही, त्याचा विचार मी अद्याप केलेला नाही."
विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार?
लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "विधानसभेलाही महाविकास आघाडीनं एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नही तसाच राहील. विधानसभेला 288 जागा आहेत, त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल. लोकसभेला 48 जागाच होत्या. माझा पक्ष आज लहान असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष आहे... असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात. आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही. जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती, पण आपण तिघंजण एकत्र यायचं, त्यामुळे या तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं पाहिजे. हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं."
बारामतीत विजय पक्का? शरद पवार म्हणाले...
बारामतीत विजयाची खात्री आहे का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच व्हायचा नाही, पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही."