Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Sanjay Raut : पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय.
Sanjay Raut on Eknath Shinde : महायुतीत पालकमंत्रीपदावरुन (Maharashtra Guardian Ministers List) खडाजंगी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचे दिसून आले. नाशिकमधून गिरीश महाजन आणि रायगडमधून अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, हा निर्णय स्थगित करण्यात आला. तसेच पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे हे नाराज होऊन आपल्या मुळगावी दरे गावात निघून गेल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे दरे गावाला निघाल्याची माहिती मिळत आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय.
संजय राऊत म्हणाले की, आधी शपथविधी होतं नव्हता, मंत्री कोण होणार? हे माहित नव्हतं. खाते वाटपाला विलंब झाला. आता पालकमंत्री जाहीर केले तर धुसफूस सुरु आहे. बहुमत मिळवलं आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करत आहात. पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली. आमचे ठाण्याला उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना राग आला की ते आपल्या दरेगावाला जातात. तुम्ही राग, लोभ बाजूला ठेवा. विजयाच्या धक्क्यातून हे लोकं अजून सावरले नाहीत. दरे हे एकनाथ शिंदे यांचे दावोस आहे. एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहेत. त्यांनी कुंभमेळ्यात जावं. आयआयटीवाले बाबा पाहिले आता आपण दरेगाववाले बाबा पाहू, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्या नाराजीचे कारण तर सांगा. का वेळोवेळी हे नाराज होतात? रूसू बाई रूसू, कोपऱ्यात जाऊन बसू हे काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी, नेमकं कारण काय? हे आम्हाला सांगावे, असेही त्यांनी म्हटले.
दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार
उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणले, आता एकनाथ शिंदे यांना संपवून नवीन उदय कोणाचा करणार? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केलाय. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसला वाटत असेल उद्धव ठाकरे संपले ते कधीही संपले नाहीत. तुम्ही काँग्रेस स्वतः कडे बघा, असा पलटवार काँग्रेसवर करत जेव्हा एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी रुसले होते, तेव्हा 'उदय' होणार होता. दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, अशी माझी माहिती आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. हे भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील, फोडाफोडी हेच त्यांचे जीवन आणि राजकारण आहे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
आणखी वाचा