राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
मुंबईमध्ये स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. महाराष्ट्रात 1977 साली म्हाडाची स्थापना झाली. तेव्हापासून म्हाडाने सर्वांसाठी घरं बांधली. म्हाडाने आतापर्यंत साडे सात लाख घरं वाटली आहेत.
मुंबई : राजधानी मुंबईत आपलं स्वत:चं घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईतील या घरासासाठी राज्यातील आमदार-खासदार व इतर लोकप्रतिनिधीही इच्छुक असतात. त्यामुळेच, म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकप्रतिनिधींसाठीही घराची आरक्षित सोडत असते. गेल्या महिन्यात म्हाडाकडून (Mhada) 2030 घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता, या लॉटरीची सोडत आज निघाली असून 2030 जणांचं मुंबईतील स्वप्नाचं घर (Home) आता सत्यात उतरलं आहे. त्यामध्ये, अनेक मराठी कलाकारांना घर लागलं असून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनाही म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं आहे. या सोडतीसाठी 1 लाख 13 हजार जणांनी अर्ज केला होता. मात्र, या अर्जदारांपैकी फक्त 2030 भाग्यवंतांना हे घर मिळाले आहे. उर्वरित अर्जदारांची निराशा झाली आहे. पण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घराचे स्वप्न बघणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच आणखी एक लॉटरी आणणार आहोत, असे सावे यांनी जाहीर केले आहे.
मुंबईमध्ये स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. महाराष्ट्रात 1977 साली म्हाडाची स्थापना झाली. तेव्हापासून म्हाडाने सर्वांसाठी घरं बांधली. म्हाडाने आतापर्यंत साडे सात लाख घरं वाटली आहेत. त्यातील अडीच लाख घरं मुंबईतच दिलेली आहेत. प्रत्येकाला आपलं घर मिळावं हाच यामागचा उद्देश आहे. आजच्या लॉटरीसाठी एक लाख तेरा हजार अर्ज आले होते. त्यापैकी, 2030 जणांना म्हाडाच्या लॉटरीत नशिबाने घर मिळालं आहे. राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून या घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्या कोट्यातून त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना म्हाडाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे घर निश्चित झालं होतं.
म्हाडाने आज अधिकृत सोडत जाहीर केल्याने माजी खासदार राजू शेट्टी देखील आता मुंबईकर होणार आहेत, त्यांना मुंबईतील पवई भागात घर मिळालं असल्याने ते आता पवईकर होणार आहेत. शिवार ते मुंबई पवईकर असा राजू शेट्टींच्या घराचा प्रवास आहे. राजू शेट्टी यांनी एमपी म्हणजेच खासदार कोट्यातून मध्यम श्रेणीतील घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्यांना पवईतील मध्यम श्रेणीतील घर लागलं असून या घराची किंमत जवळपास 1 कोटी 20 लाख रुपये एवढी आहे. या कोट्यात एकूण 3 घरं उपलब्ध होती, त्यामध्ये केवळ एक अर्ज आल्यानं राजू शेट्टी यांना लोकप्रतिनिधी कोट्यातून मुंबईकर होण्याची संधी मिळाली. राजू शेट्टी यांना पवईतील कोपरी पवई येथील घरं लागलं आहे, त्यांनी ज्या घरासाठी अर्ज केला होता त्याची किंमत 1 कोटी 20 लाख 13 हजार 323 रुपये इतकी आहे. त्यामुळं म्हाडाची सोडत जाहीर होण्यापूर्वीच त्यांचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण आज म्हाडाकडून त्यांच्या देखील घराची अधिकृत घोषणा झाली आहे.
मराठी कलाकारांनाही म्हाडाची लॉटरी
मराठी कलाकारांनीही म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता, त्यांनाही लॉटरी लागली असून गोरेगावचं घर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला मिळालं आहे. कन्नमवार नगरमधील घर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने याला मिळालं.तर, पवईमधील दोन्हीही घरं ही मराठी कलाकारांच्या नशिबात आलेली असून अभिनेता गौरव मोरे आणि शिव ठाकरे यांना ही घरं मिळाली आहेत. पवईमधील म्हाडाच्या एचआयजी श्रेणीतील घरांसाठी दोघांकडूनही अर्ज करण्यात आला होता. पवईतील या उच्च श्रेणीतील घरांची किंमत जवळपास 1 कोटी 78 लाख इतकी होती.
हेही वाचा
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार