Raj Thackeray : राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर करावी, राज ठाकरेंचा हिंदी सक्तीवरुन देवेंद्र फडणवीसांवर पलटवार अन् चॅलेंज
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मिरा भाईंदरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय असा सवाल राज ठाकरेंनी केला.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोडमधून त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोडमध्ये मध्ये मनसैनिकांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात मराठी बांधवांनो, भगिनींनो मातांनो अशी केली. याच भाषणात त्रिभाषा सूत्राचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंनी आव्हान दिलं.
देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान
राज ठाकरे म्हणाले,काय विषय होता, पहिली ते पाचवी राज्य सरकारनं हिंदी कम्पलसरी केली होती. पहिलीपासून हिंदी शिकली पाहिजे त्याच्यावरुन हे सुरु झालं. काल आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार, राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या धसक्यानं निर्णय मागे घ्यायला लागला होता, अशी आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली.
फडणवीस जी तुम्ही सांगतायना तिसरी भाषा सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आता सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी ते हिंदी आणायचा प्रयत्न करुन बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, इतर बाकीच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करण्यासाठी लागलेला आहात. कुणाच्या दबावासाठी, कोण दबाव टाकतंय, केंद्राचं हे पूर्वीचं आहे. काँग्रेस असल्यापासून सुरु आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबई गुजरातला द्यायचं स्वप्न
राज ठाकरे म्हणाले की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा लढा प्रचंड झाला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो काही गुजराती व्यापाऱ्यांचा आणि गुजराती नेत्यांचा होता. आचार्य अत्र्यांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला. मुंबई महाराष्ट्राला देऊ नका असं पहिलं बोलणारे सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांना आम्ही आजपर्यंत लोहपुरुष मानत आलो. या देशाचे गृहमंत्री ज्यांच्याकडे आदरानं पाहत आलो त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला, असं राज ठाकरे म्हणाले. मोरारजी देसाईंनी गोळीबार करुन मराठी लोकांना ठार मारलं होतं. गेल्या अनेक वर्षापांसून मुंबईवर डोळा आहे. हे चाचपडून बघत आहेत तुम्हाला, तपासून बघत आहेत. हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र पेटतोय, मराठी माणूस पेटतोय का, तो शांत बसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल, हळू हळू करुन मुंबईत ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची हे त्यांचं स्वप्न आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
























