'आता उद्धव सरकारची जाण्याची वेळ आली आहे', एकनाथ शिंदेंच्या बंडावर आठवलेंची प्रतिक्रिया
Ramdas Athawale On Maharashtra Political Crisis: आज सकाळपासूनच महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध मोठे बंड पुकारले आहे. यावरच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Ramdas Athawale On Maharashtra Political Crisis: आज सकाळपासूनच महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध मोठे बंड पुकारले आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे 35 आमदार फोडले आहे. त्यानंतर राज्य सरकार अस्थिर होण्याची परिस्थिती ओढवलेली आहे. यावरच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रातून उद्धव सरकार जाण्याची वेळ आली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35-36 आमदार आहेत. शिवसेनेच्या लोकांनी भाजपसोबत सरकार स्थापन करू, असे सांगितले, मात्र तसे न झाल्याने शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्यांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होणार आहे.'' उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
रामदास आठवले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, ''राज्य सरकारने विकासकामे करण्याऐवजी केवळ भाजपवर आरोप करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात कुठेही विकास झालेला नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासारखे मोठे नेते आहेत, या नेत्यांना आमदारांचाही पाठिंबा आहे. एकनाथ दोनतृतीयांशहून अधिक असंतुष्ट आमदारांसह आले तर त्यांच्या सदस्यत्वावर कोणताही परिणाम होणार नाही.'' ते पुढे म्हणाले की, ''2013 मध्ये बाळासाहेबांच्या वाढदिवसाला मी म्हटले होते की, शिवशक्तीसोबत भीमशक्ती आली तरच सत्ता मिळेल.'' ते म्हणाले की, ''शिवसेनेशी आमचे वैचारिक मतभेद होते.''
मी एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार असल्याचे आठवले म्हणाले. अडीच वर्षाचा फॉर्म्युला चालणार नाही, असे मी उद्धव यांना सांगितले. भाजपनेही त्यांना हेच सांगितले होते. पण शिवसेना अडीच वर्षांच्या मागणीवर ठाम होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी शिंदे हे किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे ते म्हणाले. आठवले म्हणाले, आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र महाराष्ट्रात लवकरच भाजपचे सरकार स्थापन होणार, असं दिसत आहे.