दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंचा आवाज घुमणार, पॉडकास्टच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका जाहीर करणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष!
Raj Thackeray : राज ठाकरे राज्यातील जनेतशी तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांशी पॉडकास्टच्या माध्यमातून काही वेळात संवाद साधणार आहेत.
मुंबई : दसरा, विजयादशमीनिमित्त आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. आज राज्यात एकूण चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. यातील दोन दसरा मेळावे हे मराठवाड्यात तर दोन दसरा मेळावे मुंबईत होणार आहेत. मुंबईत होणारे दसरा मेळावे हे शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटाचे आहेत. म्हणजेच या दिवशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. असे असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (RaJ Thackeray) हेदेखील दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
पॉडकास्टमध्ये नेमकं काय असणार?
राज ठाकरे यांच्या पॉडकास्टला सकाळी 9 वाजता सुरवात होणार आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दरवर्षी दसऱ्यानिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. मात्र यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याव्यतिरिक्त राज ठाकरे यांच्या पॉडकास्टकडेही राज्याचे लक्ष असेल. लवकरच राज्यात विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे यांच्या या पॉडकास्टला विशेष महत्त्व आले आहे.
मनसेकडून विधानसभेची जय्यत तयारी
गेल्या काही दिवसांपसून मनसेकडून विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली जात आहे. त्यासाठी खुद्द राज ठाकरे हे सक्रिय झाले असून ते राज्यभरातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना भेटत आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी काही जागांवर मनसेचे उमेदवारही घोषित केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मनसे हा पक्ष पूर्ण ताकदीने उतरल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र राज यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज होणाऱ्या पॉडकास्टच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदान तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. हे दोन्ही नेते या मेळाव्यांत नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
Dasara Melava 2024 Live : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, प्रचाराचं रणशिंग फुंकणार
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे