(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulabrao Patil : संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे'; गुलाबराव पाटलांचा पलटवार
Gulabrao Patil on Sanjay Raut : जनता ही मूळ शिवसेनेच्या सोबतच आहे. बाकी डुप्लिकेट लोक खूप येत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली होती. आता गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : आज मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (Shiv Sena Dasara Melava 2024) पार पडणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. जनता ही मूळ शिवसेनेच्या सोबतच आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरचा मेळावा आहे. बाकी डुप्लिकेट लोक खूप येत आहेत, असे त्यांनी म्हटले. यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत स्वत:ला काय समजतात हेच कळत नाही. बाळासाहेबांची अॅक्टींग करतात काय, मफलर इथे तिथे फिरवतात काय, गालावर हात ठेवतात काय, त्यांना आता कोणी प्रतिस्पर्धी उरलेला नाही. उद्धव साहेबांनंतर त्यांचाच नंबर आहे असं त्यांना वाटू लागलं आहे. कधी ते ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडून आले नाही. काय तर फक्त भाषण चांगलं करतात, पण या लोकांमुळेच ही संघटना गेली आहे, अशी टीका त्यांनी केली.
राऊत बाळासाहेबांची स्टाईल करायला जातात, पण...
ते पुढे म्हणाले की, गद्दार हा त्यांचा कॉमन शब्द आहे. विकासाबाबत त्यांच्याकडे शब्द नाहीत. पिक्चर संपलाय आता, गद्दार, खोके हे शब्द आता घासून गेलेले आहेत. संजय राऊत म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे' अशा पद्धतीचा तो माणूस आहे. राऊत बाळासाहेबांची स्टाईल करायला जातात. ते शब्द बाळासाहेबांच्या मुखातच चांगले वाटतात. हे कोण होते, कसे वर आले, कोणाच्या मतांवर खासदार झाले हेही सांगा. गद्दारांची मत घेतली म्हणून ते दिल्लीत गेले. ऐवढीच खार असेल तर राजीनामा देऊन राऊतांनी खुद्दारी करून दाखवावी. मात्र ते देणार नाहीत, असे त्यांनी म्हटले.
बाळासाहेबांनी आम्हाला राजकीय जन्म दिला
दरम्यान, दसरा मेळाव्याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना प्रमुखांचा दसरा मेळावा हा आमच्यासाठी परवणी होती. इथं लोकलने येऊन सार्वजनिक शौचालयात अंघोळ करून साहेबांच्या विचारांचे सोने लुटुन वर्षभर त्या विचारांची अंमलबजावणी करायचो. ही आठवण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आज आम्ही जे आहोत ते बाळासाहेबांमुळे. साहेबांनी कधी जात पाहिली नाही, किती पैसे आहेत ते विचारले नाही. प्रत्येकाचे काम पाहून त्याला संधी दिली. त्यामुळेच अनेक जण नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झाले. माझे जन्म देणारे वडील जरी दुसरे असले तरी राजकीय जन्म हा बाळासाहेबांनीच दिला. त्यांच्यामुळे आम्ही आज आहोत.
आणखी वाचा