मी स्वत: चेकने पैसे दिले होते; 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबद्दल दीपक केसरकरांनी दिली माहिती
शालेय शिक्षण विभागाने राबवलेली स्वच्छता मॉनिटर संकल्पना गुंडाळल्यानंतर हे कंत्राट घेतलं त्या रोहित आर्याचे 45 लाख रुपये शालेय शिक्षण विभागाने बुडवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता.

मुंबई : शहरातील (Mumbai) रोहित आर्य नावाच्या इसमाने त्याच्याकडे एक्टींग क्लाससाठी आलेल्या 16 शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याची खळबळजनक घटना दुपारी घडली. या थरारक घटनेत पोलीस आणि रोहित आर्य यांच्या झालेल्या चकमकीत रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने ओलीस ठेवण्यात आलेल्या सर्वच मुलांची सुखरुपपणे सुटका करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. मात्र, रोहित आर्यने (Rohit arya) हे टोकाचं पाऊल का उचललं असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने रोहितचे पैसे थकवल्याचा आरोप त्याच्याकडून केला जात असून यासाठी दोनवेळा त्याने उपोषण देखील केले होते. मात्र, शिक्षण विभागाने त्याला चेकने पैसे दिल्याचं तत्कालीन शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी म्हटलं आहे.
शालेय शिक्षण विभागाने राबवलेली स्वच्छता मॉनिटर संकल्पना गुंडाळल्यानंतर ज्याची संकल्पना होती, ज्यांनी हे कंत्राट घेतलं त्या रोहित आर्याचे 45 लाख रुपये शालेय शिक्षण विभागाने बुडवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना राबवण्यात आली होती. त्यामध्ये समाजात होणाऱ्या गैरप्रकारावर विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावं, अशा प्रकारची सवय या संकल्पनेतून लागावी यासाठी हे अभियान राबवण्यात आले. मात्र, एक वर्ष हे अभियान सुरु राहिले, त्यानंतर ते गुंडाळण्यात आले. पण, त्यासाठी 2 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट रोहित आर्यला देण्यात आलं होतं, आणि त्यातील 45 लाख रुपये अजूनही शालेय शिक्षण विभागाने दिले नाहीत, असा त्याचा आरोप होता. त्यामुळेच, 1 मे पासून रोहित आर्या आझाद मैदानावर आंदोलनाला बसला. त्यानंतर त्याने शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची भेट घेतली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. त्यातूनच, गेल्या काही दिवसांपासून रोहित मानसिक तणावात होता आणि ट्रीटमेंट सुद्धा घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे. आता, यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकरांनी दिली माहिती, मी चेकने पैसे दिले
"मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा पर्सनली रोहित आर्य यांना मदत केली होती. मी चेकने त्यांना स्वत: पैसे दिले आहेत. पण, सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे की, 2 कोटी मला येणं आहे हा मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत", असं दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, रोहित आर्य हे स्वच्छा मॉनिटर नावाची एक स्किम चालवत होते. ते शासनाच्या मोहीमेत सहभागी झाले होते. त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं. पण, रोहित आर्य यांचं म्हणणं होतं की, आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही. याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता. अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटलं.
नेमका प्रकार काय?
पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून सिनेमा, वेब सीरीजसाठी कास्टिंग केले जात होते. त्यासाठी, 17 जणांचे फाइनल कास्टिंग झाले. त्यामुळेच, येथील स्टुडिओत आज 17 मुले आणि दोन पालक उपस्थित होते. दुपारी जेवणाच्या वेळेत ही मुले स्टुडिओतून बाहेर गेल्यानंतर पालक चिंतेत होते. कारण, ही मुले काचेतून आपला हात दाखवत इशारा करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतरच हा किडनॅपिंगचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. स्वत:ला फिल्ममेकर समजणाऱ्या आरोपी रोहित आर्यने हे कृत्य केले होते.
कोण आहे रोहित आर्य (Who is rohit arya)
रोहित आर्य हा मुंबई पवई परिसरात एक्टींग क्लासेस आणि ऑडिशनसंदर्भातील काम करतो. सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटीव्हेशन स्पीकर अशी सांगतो. 'अप्सरा' नावाने त्याचे युट्यूब चॅनेल आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असून आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
रोहितचे प्रोजेक्टमध्ये गुंतले पैसे (Rohit arya project investent)
रोहित आर्य मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, सरकारकडे त्याचे पैसे आहेत, त्याने लोन काढून राज्याच्या शालेय शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता. स्वच्छता मॉनिटरसंदर्भातील या प्रोजेक्टसाठी त्याचे पैसे लागले असून सरकारने त्याचे पैसे न दिल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.


















