अकोला पश्चिमवरुन मविआत रस्सीखेच, काँग्रेसचा 30 वर्षांपासून सातत्याने पराभव; ठाकरेंच्या शिवसेनेने शड्डू ठोकला, उद्धव ठाकरेंनाही साकडे
Akola West Constituency: अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये गेली 30 वर्ष सातत्याने काँग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला असून उद्धव ठाकरेंनाही साकडे घातले आहे.
Maharashtra Assembly Election 2024 अकोला : विदर्भातील 12 जागांवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस (Congress) आणि शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) वाद विकोपाला गेल्याचं समजते आहे. वरवर तह झाल्याचं सांगितलं जात असलं तरी दोघांपैकी कुणीही दोन पाऊले मागे घेण्यास तयार असल्याचे दिसत नाहीये. हिच परिस्थिती आता अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदारसंघात (Akola West Constituency) मविआमध्ये दिसत आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने अकोला पश्चिम मतदारसंघावर दावा केलाय. अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये गेली 30 वर्ष सातत्याने काँग्रेसचा पराभव होत तेथे भाजपचा उमेदवार विजयी होतोये. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा असणार असल्याचं स्पष्ट मत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रकाश डवले यांनी व्यक्त केले. हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटावा यासाठी ठाकरे गटाचे शहरातील नेते मूंबईत मातोश्रीवर ठाण मांडून बसले आहेत. त्यामूळे जागा वाटपात शेवटच्या क्षणापर्यंत अकोला पश्चिम लिधानसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ताणाताणी होण्याची शक्यता आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघात 2019 प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :
उमेदवार - पक्ष - मते
गोवर्धन शर्मा - भाजप - 73262
साजिदखान पठाण - काँग्रेस - 70669
मदन भरगड - वंचित - 20687
भाजपाचे गोवर्धन शर्मा 2593 मतांनी विजयी
2014 मध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
विजयी : गोवर्धन शर्मा : 39,953 मतांनी
1. गोवर्धन शर्मा : भाजप : 66,934
2. विजय देशमुख : राष्ट्रवादी : 26,981
3. आसिफखान : भारिप-बमसं : 23,927
4. गुलाबराव गावंडे : शिवसेना : 10,572
5. उषा विरक : काँग्रेस : 9,164
अकोल्यात 30 वर्षांपासून सातत्याने काँग्रेस पराभूत
महाराष्ट्र निर्मितीपासून तर थेट 1995 पर्यंत या मतदारसंघावरचा काँग्रेसचा सुर्य कधी मावळलाच नव्हता. 1995 पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, प्रा. अझहर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलं आहे. मात्र, 1995 पासून आजपर्यंत तब्बल सहावेळा या मतदारसंघात भाजपचं कमळ फुललंय. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तब्बल सहावेळा सलग हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राखला. 2023 मध्ये निधन होईपर्यंत तेच पक्षाचे आमदार होते. भाजपच्या या मतदारसंघातील ताकदीचे मर्म लपलेय ते मजबूत पक्षसंघटन, कार्यकर्त्यांचे जाळे अन या सर्वांना एका धाग्यात बांधणारं नेतृत्व होतं दिवंगत गोवर्धन शर्मा अर्थातच 'लालाजी'.
1995 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होताय. मात्र, काँग्रेसच्या या गडाला अंतर्गत मतभेदांचा विळखा पडला अन हा मतदारसंघ अलगदच भाजपच्या ताब्यात गेला. 1995 पासून या मतदारसंघात काँग्रेसकडून प्रा. अजहर हुसेन, अरूण दिवेकर, रमाकांत खेतान, उषा विरक आणि साजिदखान पठाण यांचा पराभव झाला आहे. मात्र, 2019 मध्ये काँग्रेसच्या साजिदखान पठाण यांचा अवघ्या 2593 मतांनी पराभव झाला होता. तर आताच्या लोकसभेत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना 12 हजारांवर मतांची आघाडी होती. त्यामूळे काँग्रेसला यावेळी संधी असल्याचं वाटत आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा करतांना काँग्रेसच्या सातत्याने होत असलेल्या पराभवाचा दाखला दिला आहे. संपूर्णतः शहरी असलेला हा मतदारसंघ आहे. अकोला महापालिकेच्या 20 पैकी 15 प्रभागांचा या मतदारसंघात समावेश आहेय. गेल्या महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता होती. महापालिकेत 80 पैकी 48 नगरसेवक भाजपाचे होते. तर काँग्रेसचे 13 तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक महापालिकेत होते.
काँग्रेसला मतदारसंघ मिळू नये म्हणून झाले होते 'पोस्टर वॉर'
अकोला पश्चिम या मतदारसंघात काँग्रेसने दावा केल्यानंतर शहरात काँग्रेसविरूद्ध पोस्टर वॉर झालं होतं. यामागे ठाकरे गटच असल्याची चर्चा शहरात होती. मागील तीस वर्षापासून काँग्रेसचा पराभव होतोय, येथील जनता पुन्हा काँग्रेसला संधी देणार का? असा सवाल ठाकरे गटाने बॅनरबाजीतून उपस्थित केला होता.
ठाकरे गट अकोला शहरात खेळणार 'मराठी कार्ड'?
अकोला शहरात गेल्या तीस वर्षांपासून भाजपच्या गोवर्धन शर्मा यांच्या रूपाने हिंदी भाषिक आमदार होता. काँग्रेसनेही गेल्या तीस वर्षांत येथून सातत्याने भाजपविरोधात हिंदी भाषिकच उमेदवार दिला होता. शहरात गुजराती, मारवाडी, सिंधी मतदारांसोबतच मोठ्या संख्येने मराठी भाषिक मतदार आहेत. या मतदारसंघात दलित मतदारांचं प्रमाणही मोठं आहे. त्यामूळे हा मतदारसंघ वाट्याला आल्यास ठाकरे गट मराठी कार्ड खेळण्याचा विचार करू शकते. त्यामूळे शिवसेना ठाकरे गट येथून पक्षाचे नेते प्रा. प्रकाश डवले, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर आणि जेष्ठ नगरसेविका मंजुषा शेळके यांना रिंगणात उतरविण्याचा विचार करू शकते. प्रा. प्रकाश डवले यांनी दोन वर्षांपासून शहरात तयारी करीत आहेत. प्रकाश डवले शिकवणी वर्ग आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेयेत.
काँग्रेसने अकोला पश्चिमचा अट्टहास सोडावा : प्रा. प्रकाश डवले
अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये गेली 30 वर्ष सातत्याने काँग्रेसचा पराभव होत, भाजपाचा उमेदवार इथं विजयी होत आहेय. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा असणार, असं स्पष्ट मत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रकाश डवले यांनी व्यक्त केले. मतदारसंघातील पराभव पाहता काँग्रेसने आपला हट्ट सोडावा, आणि एक पाऊल मागे घ्याव, असं आवाहनही डवले यांनी केलेये. विकास न झाल्याने मतदारांमध्ये रोष आहे. सामान्य जनता, युवक, युवती, विविध समाजीक संघटनांसोबत नाळ जोडलेला नेता म्हणून आपण स्वतः या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे ते म्हणालेत. मागील काही दिवसांपासून डवले हे उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत.
मविआमधून कोण आहे मतदारसंघासाठी इच्छुक?
मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अकोला पश्चिम या जागेवरून मोठा वाद आहे. ही जागा आपल्याकडे राहावी, असा आग्रह ठाकरे गट धरून आहे. ठाकरे गटातून शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मिश्रा, शिवसनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश डवले आणि इतर. तर काँग्रेसकडून मनपाचे मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, जिशान हुसेन, रमाकांत खेतान, लोकसभेतील पराभूत उमेदवार डॉ. अभय पाटील आणि इतर शर्यतीत आहे. मात्र शरद पवार गटाकडून कोणीही नाहीये. त्यामुळे मविआमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघ कोणाच्या वाटेवर जातोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, 2593 फरकाच्या मतांनी याच मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांचा पराभव झाला होता आणि भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा हे विजयी झाले होते.
त्यामूळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमका कुणाला सुटतो?. काँग्रेसला सुटला तर ते पराभवाची मालिका खंडीत करणार का?. जर ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ गेला तर ते विजयाचा नवा इतिहास घडवणार का?. की परत जनता भाजपवरच विश्वास टाकणार?, या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवसांत मिळणार आहेत.
हे ही वाचा