Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Jitendra Awhad on Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केलाय.
Jitendra Awhad on Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur School Case) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पोलिसांना जबाबदार धरले आहे. या प्रकरणात पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवले असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खळबळजनक दावा केलाय. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली. कोर्टाने सांगून देखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. आरोपी चुपचाप सुटून जाणार, असे त्यांनी म्हटले.
आज शनिवारी (दि. 15) मुंबईत बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मुंबईत शनिवारी (दि. 25) जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चातून जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदे प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, अक्षय शिंदे याची निर्घुण हत्या करण्यात आली. अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही. बलात्कार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली. अक्षय शिंदे प्रकरणात अद्याप पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नाही, असे त्यांनी म्हटले.
आरोपी चुपचाप सुटून जाणार
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अक्षय शिंदे बलात्कार प्रकरण नाही ते लैंगिक शोषण प्रकरण आहे. बलात्कार हे मी चुकून बोललो होतो. पण अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कुणाला तरी वाचवण्यासाठी करण्यात आला. या प्रकरणात आपण पहिले असेल की त्या ठिकाणचे सीसीसीटीव्ही कसे काय गायब झाले. त्याचा ऍक्सेस कुणाकडे होता? मी हा विषय सुरुवातीपासून बोलत आहे. त्यामुळे मी बोलायला घाबरत नाही. कुणाला तरी आम्ही न्याय केला हे दाखवायचं होत म्हणून त्यांनी एनकाउंटर केला. परंतु कोर्टाने त्यांना फटकारले. कोर्टाने सांगून देखील अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. माझ स्पष्ट म्हणणं आहे की, अद्याप गुन्हा दाखल झाला नाही आणि होणार देखील नाही. चुपचाप आरोपी सुटून जाणार, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या