Maharashtra Cabinet Expansion: राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार? खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांना डच्चू, भाजप तरुण चेहऱ्यांना संधी देणार
Maharashtra Politics: मोठी बातमी: राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. पावसाळी अधिवेशनापूर्वी कोणत्या आमदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी, कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार, उत्सुकता वाढली
मुंबई: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाल्यानंतर आता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी माहिती आहे.
अजित पवार हे 2 जुलै 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाले होते. त्यावेळी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादांच्या गटातील नेत्यांना मोठ्याप्रमाणावर संधी मिळाली होती. यानंतर आणखी एक छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पार पडले, अशी चर्चा होती. मात्र, आता वर्ष उलटत आले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता येत्या एक ते दोन आठवड्यांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीत रविवारी एनडीए सरकारच्या 72 मंत्र्यांना शपथ घेतली. मात्र, यामध्ये शिंदे गटाला केवळ एक राज्यमंत्रीपद तर अजितदादा गटाला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्याची भरपाई आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात केली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारमधील शिंदे गट आणि अजितदादा गट हे सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे निर्माण झालेले नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी 15 दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. हा खांदेपालट करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय,गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील. जेणेकरुन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या घटकपक्षांमधील नेत्यांमध्ये उत्साह निर्माण होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार-आमदारांशी संवाद साधणार
मुख्यमंत्र्याची आज आमदार व खासदारांसोबत करणार महत्वाची बैठक. लोकसभा निवडणूकीत महायुतीची सुमार कामगिरी पहायला मिळाली. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकी त्या चुका होऊ नये या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. तसेच मतदार संघातील विकासाची प्रलंबित काम, मतदार संघातील मित्र पक्षातील समन्वय यावर मुख्यमंत्री करणार चर्चा. सर्व आमदारांसोबत संध्याकाळी सहा वाजता तर खासदारांसोबत सात वाजता वर्षा बंगल्यावर होणार बैठक होणार आहे.
आणखी वाचा
मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये 72 मंत्री! भाजपचे सर्वाधिक 60 मंत्री; शिवसेना, RPIला एक-एक राज्यमंत्रीपद