Madha Constituency : मोहिते पाटलांनी नकार दिल्यास माढ्यातून कोणाला तिकीट, शरद पवारांपुढे पेच; मार्ग कसा काढणार?
माढ्यातून कोणाला उमेदवारी द्यावी, अशा प्रश्न शरद पवार यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) माढ्यात भाजपने रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) हा मतदारसंघ शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र पवारांनी या जागेवर अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या जागेवर ओबीसी समाजातून येणाऱ्या नेत्याला उमेदवारी द्यावी, असे पवारांचे मत होते. त्यासाठी ते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नावाचा विचार करत होते. मात्र जानकर यांना ऐनवेळी महायुतीकडून (Mahayuti) उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता शरद पवार या जागेसाठी अन्य उमेदवाराचा शोध घेत आहेत. या जागेवर धैर्यशील मोहिते पाटलांचा विचार केला जात आहे. मात्र त्यांचा राष्ट्रवादीत अद्याप प्रवेश न झाल्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोणाला संधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास अभयसिंह जगताप किंवा डॉ. अनिकेत देशमुख यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुतारी कोणाच्या हातात द्यायची?
माढा लोकसभा मतदारसंघाने जशी महायुतीची डोकेदुखी वाढवली तसाच प्रकार शरद पवार यांच्याबाबतीतही घडतोय. कारण मोहिते पाटील यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे पवारांना या जागेसाठी अन्य पर्यायही निवडता येत नाहीये. दुसरीकडे पवार यांनी वारंवार माढा लोकसभेतून धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची इच्छा बोलून दाखवल्याने धनगर समाजातून येणारे अनेक नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्यामुळे आता माढा लोकसभेतून कोणाच्या हाती तुतारी द्यायची असा प्रश्न शरद पवार यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
मोहिते पाटील हाती तुतारी घेणार अशा चर्चा
भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यानंतर मोहिते पाटील हाती तुतारी घेणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे धाकटे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उभे राहणार, असे जाहीर केले होते. दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील किंवा त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणतीच स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
अनेक नेत्यांनी मागितली उमेदवारी
दुसऱ्या बाजूला मोहिते येणार म्हणून शरद पवार यांनी माढा लोकसभेची उमेदवाराची घोषणा केलेली नाही. जानकर यांना महायुतीतून तिकीट मिळाल्यामुळे भाई जयंत पाटील यांनी या जागेवर दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी उमेदवारी मागितली. गणपतराव देशमुख यांचे शिष्य असणारे यशवंत सेनेचे प्रदेश संघटक प्रा. रघुनाथ पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माढा लोकसभेवर दावा सांगितला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनीही या जागेसाठी पवार यांना गळ घातली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे ३८ टक्के असणारे निर्णायक मतदान दुर्लक्षित करता येत नसल्याने पवार यांनी धनगर समाजासाठी हा मतदारसंघ सोडण्याची भूमिका घेतली आहे. आता धनगर समाजाला उमेदवारीच्या डावलले तर या समाजाची नाराजी पवार यांना सोसावी लागणार आहे .
मोहिते घराण्याची अडचण
माढा लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून पक्षातील तरुण नेते अभयसिंह जगताप यांनीही जोर लावला आहे. जयंत पाटील व इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जगताप यांच्या पारड्यात वजन टाकले आहे . जगताप हे सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील असून या भागातील राष्ट्रवादी नेते प्रभाकर देशमुख आणि माण खटाव व कोरेगाव भागातील नेत्यांनी जगताप यांच्या नावासाठी आग्रह धरला आहे . मोहिते पाटील यांना अजूनही शरद पवार यांनी कोणताही शब्द दिला नसून मोहिते पाटील हे देखील अजून अधिकृतपणे शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी गेलेले नाहीत. यामध्ये भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील रणजितदादांना डावलून कोणताही निर्णय घेणार नाहीत. जयसिंह मोहिते पाटील यांची कन्या माढा विधानसभा लढविण्यास इच्छुक असून महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. अशावेळी मोहिते पाटील कुटुंबावर देखील दोन्हीबाजूकडून दबाव असल्याने काय निर्णय घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. माढा लोकसभेसाठी भाजपाची नाराजी मोहिते पाटील यांना परवडणारी नाही. अशावेळी माढा उमेदवारीचा निर्णय ३ एप्रिल नंतर होण्याची शक्यता असून यात मोहिते पाटील यांनी तुतारी हातात न घेतल्यास शरद पवार यांना अभयसिंह जगताप किंवा शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी लागेल.