रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
बीसीसीआयतर्फे घेण्यात येत असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध बडोदा यांच्यातील सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खेळवला गेला.
नाशिक : एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी-20 सामने रोमहर्षक होत असून भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात 2 गडी राखून भारताने बाजी मारल्यानंतर क्रिकेट शौकिनांनी आनंद व्यक्त केला. तर, यंदा दिग्गज खेळाडू मैदानात उतरल्याने रणजी ट्रॉफीकडेही (Ranji trophy) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, पाठोपाठ गनमॅन विराट कोहली (Virat Kohli) हा देखील रणजीच्या मैदानात उतरत आहे. त्यामुळे, रणजी क्रिकेट सामन्यांकडे क्रिकेट चाहत्यांनी आपल्या नजरा वळवल्या आहेत. त्यातच, नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानावर तब्बल 6 वर्षांनी रणजी सामना खेळण्यात आला असून महाराष्ट्र संघाने बडोदा संघावर मात देत विजय मिळवला. आपल्या धुव्वादार खेळीने चाहत्यांची मने जिंकलेला शतकवीर सौरभ नवले येथील सामन्याच्या सामनावीर ठरला. सौरभने 83 आणि नाबाद 126 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळेच, महाराष्ट्र संघाला तब्बल 439 धावांनी विजय मिळवता आला.
बीसीसीआयतर्फे घेण्यात येत असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध बडोदा यांच्यातील सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खेळवला गेला. या ठिकाणी तब्बल सहा वर्षानंतर रणजीचा सामना खेळवल्याने जिल्ह्यातील क्रिकेट चाहत्यांचा वेगळाच उत्साह होता. या सामन्यात महाराष्ट्र संघाने बडोदा संघावर 439 धावांनी मोठा विजय मिळवला. महाराष्ट्र संघाकडून सौरभ नवलेने सर्वाधिक 83 व नाबाद 126 धावा करत मोलाची भूमिका बजावल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आलं. शेवटच्या दिवशी महाराष्ट्र संघाने दुसरा डाव आणि तिसऱ्या दिवशी अखेरच्या 7 बाद 464 धावसंख्येवर सामना नेला होता. बडोदा संघास विजयासाठी 90 षटकात जवळपास 617 धावांचे आव्हान होते. महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर बडोदा संघ केवळ 36 षटकेच टिकू शकला. मुकेश चौधरीने 5 तर रजनीश गुरबानीचे तीन आणि रामकृष्ण घोषचे दोन बळी संघाच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरले.
महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि बडोदा संघाचा कृणाल पांड्या या दोघांच्या संघाची कामगिरी बघण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिकच्या गोल क्लब मैदानावर 6 वर्षानंतर क्रिकेट प्रेमींनी गर्दी केली होती, येथे त्यांचा मोठा उत्साह दिसून आला.
विराट कोहलीचेही रणजीत पुनरागमन
बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार विराट कोहलीचे रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन होत आहे. कोहली तब्बल 13 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. या नियमांनुसार, राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी सर्व भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या खराब फलंदाजीनंतर बोर्डाने जारी केलेल्या 10-पॉइंट ऑर्डरचा हा भाग आहे. 36 वर्षीय कोहलीने त्या मालिकेत 190 धावा केल्या, ज्यामध्ये पर्थमधील शतकाचा समावेश होता.
हेही वाचा
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके