Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार; सोलापुरात पाऊल ठेवताच देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. आज आणि उद्या या दोन दिवसांत मोदी महाराष्ट्रात एकूण सहा सभा घेणार आहेत. राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये सभा.

सोलापूर: उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार आहे, अशी जळजळीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापूरमध्ये आगमन झाले. सोलापूरमध्ये पाऊल ठेवताक्षणीच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला चढवला.
पंतप्रधान मोदींनी सोलापूरमध्ये आले पाहिजे, अशी लोकांची इच्छा होती. त्यानुसार आम्ही मोदींना विनंती करताच त्यांनी आज सोलापूरमध्ये सभा दिली. मोदी सोलापूरमध्ये येणार असल्याने या परिसरात प्रचंड उत्साह आहे. आजची सभा खूप भव्य होणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
नरेंद्र मोदी आणि भाजपला मत म्हणजे विनाशाला आमंत्रण असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत केले होते. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यायची आम्हाला गरज नाही. कारण, देश पंतप्रधान मोदींनी केलेला विकास पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांनी केलेलं विकासाचं एक काम सांगावे. संपूर्ण जीवनात उद्धव ठाकरेंनी एकतरी विकासकाम केलेले मला दाखवावे. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होते, पण त्यांनी विकासाचं कुठलंच काम केले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मोदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्याचा प्रकार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. संजय राऊत ही व्यक्ती कोण आहे, ते मला माहिती नाही. पण ठाकरेंनी ते म्हणजे महाराष्ट्र आहे, या मानसिकतेमधून बाहेर आलं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
तसेच ठाकरेंकडून भाजपकडून सुरु असलेल्या धार्मिक प्रचाराबाबत केलेल्या टीकेविषयीही फडणवीसांना विचारण्यात आले. आम्ही 'राम राम' करतो याचा शिवसेनेला इतका राग का येतो? भारतामध्ये 'राम राम' करायचे नाहीतर पाकिस्तानात करायचे का? आम्ही 'राम राम' म्हणणारच, असेही फडणवीसांनी ठणकावून सांगितले. यावर आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, ते पाहावे लागेल.
आणखी वाचा
मोदीजी मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला कधीपासून कळायला लागलं? : उद्धव ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
