Uddhav Thackeray: मोदीजी मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला कधीपासून कळायला लागलं? : उद्धव ठाकरे
Maharashtra Politics: परिवारची लोक बेकार बसलेली चालतात, भीक मागतात. हा मोदींचा परिवार आहे. त्या परिवाराचे मोदी कुटुंबप्रमुख आहेत. महाराष्ट्र आणि अमित शाहांचा काडीचा संबंध नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
नांदेड: देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर तुमच्या वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रं जास्त मुलं असणाऱ्यांना दिली जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणतात. पण मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कधीपासून कळायला लागलं?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला. ते बुधवारी नांदेड मतदारसंघातील प्रचारसभेत बोलत होते. गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान विकास, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर बोलत नाहीत. ते कशावर बोलतात तर कोण मांस खातंय, कोण मच्छी खातंय, कोणाला किती मुलं होणार?, अशा विषयांवर ते बोलतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
भाजपचे नेते म्हणतात, गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मोदींचा फोटो लावून निवडून आले. पण मग या निवडणुकीत गद्दार सेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी फक्त मोदींचा फोटो का वापरला जात नाही? त्यांच्यासाठी फक्त मोदींचा फोटो का वापरत नाही? कारण मोदींचं नाव महाराष्ट्रात चालत नाही, त्यांचं नाणं महाराष्ट्रात चालेनासं झालं आहे, अमित शाह आणि महाराष्ट्राचा तर काडीचा संबंध नाही. अमित शाह इकडे येऊन फणा काढतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपूट घालतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मोदीजी मेरा परिवार म्हणतात, पण परिवारातील लोक भीक मागतात का? उद्धव ठाकरे
पंतप्रधान मोदी कायम 'मेरा परिवार, मेरा परिवार' म्हणत असतात. पण मोदींनी किती शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी दिली? परिवारातील लोकं बेरोजगार बसले आहेत, भीक मागत आहेत. मग नुसतं 'मेरा परिवार' बोलून काय फायदा?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
त्यामुळे आता या सरकारची मस्ती तुम्हाला घालवावी लागेल. निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी आहे. निवडणूक आयोग म्हणतं, 'जय भवानी' हा शब्द काढा. हा शब्द काढून प्रचारगीतात मोदींचं नाव टाकू का? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे, हे ठीक आहे. पण दैवतावरही तुमचा आकस आहे. यंदाच्या निवडणुकीत आपल्याला नांदेडमधील चिखल साफ करायचा आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
आणखी वाचा