Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची जबरदस्त स्ट्रॅटेजी, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाच्या घरी चहापान, इंदापुरात हालचालींना वेग
Maharashtra Politics:देवेंद्र फडणवीसांनी इंदापुरात पाऊल टाकताच चक्रं फिरली, सुप्रिया सुळे समर्थकाचं घर गाठलं. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण माने यांच्यात काही काळ चर्चा झाली. बारामती लोकसभेचं समीकरण बदलणार?
इंदापूर: बारामती लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समेट घडवण्यासाठी आणि महायुतीमधील एकोपा वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शुक्रवारी इंदापूरमध्ये (Indapur) सभा होत आहे. या सभेपूर्वी इंदापूरमध्ये उतरल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा डाव टाकल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथे सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने (Pravin Mane) यांच्या घरी जाऊन चहापान केले. यानंतर प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे गटातील मानले जातात. ते 15 दिवसांपूर्वीपर्यंत इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा प्रचार करत फिरत होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली, याचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभेसाठी प्रवीण माने यांना अजितदादा गटाच्या बाजूने वळवण्यासाठी घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची शक्यता आहे. प्रवीण माने जर अजित पवारांसोबत गेले तर इंदापुरात सुप्रिया सुळे यांना फटका बसू शकतो. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर फडणवीसांनी इंदापूरमध्ये आणखी एका अजित पवार विरोधकाला आपल्या बाजूने वळवल्यास लोकसभेला सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळू शकते.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोनाईचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे पुत्र प्रवीण माने यांची शुक्रवारी दुपारी इंदापूरमधील निवासस्थानी भेट घेतली. मागच्या काही दिवसापर्यंत प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत होते. परंतु देवेंद्र फडणवीस इंदापुरात उतरल्यानंतर थेट माने कुटुंबीयांच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रवीण माने यांच्या घरी गेले त्या ठिकाणी शिरूरचे वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल देखील उपस्थित होते. मंगलदास बांदल यांनी मी दशरथ माने यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस याठिकाणी आले. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मंगलदास बांदल यांनी स्पष्ट केले.
प्रवीण माने यांच्या भेटीनंतर फडणवीस काय म्हणाले?
प्रवीण माने यांच्या घराबाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, माने दादांशी माझे जुने आणि वैयक्तिक संबंध, ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून मागे लागले होते, तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे येत नाही. त्यामुळे मी कबुल केले होते, मी तुमच्याकडे चहा पिण्यासाठी येईन, त्यानुसार चहा पिण्यासाठी गेलो होते. ते आमच्यासोबतच आहेत, ते आमचे जुने सहकारीच आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आणखी वाचा
बारामती, मावळ, शिरुरमध्ये मतदार आक्रमक, थेट निवडणुकीवर बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?