Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Mahayuti cabinet allocation: महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आता मंत्रीपद आणि खातेवाटपाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या मनसेबाबत एक वक्तव्य केले आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीत 128 जागांवर उमेदवार उभे करुनही एका जागेवरही विजय न मिळाल्यामुळे वाताहत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत (MNS) राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे पक्षाला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या अभिनंदनाचे आणि विधायक उपक्रमांना पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबाबत सकारात्मक आणि आशादायक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी 'सह्याद्री' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसेविषयीचा सॉफ्ट कॉर्नर कायम असल्याचे दिसून आले. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला खुल्या दिलाने बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदाही झाला. पण विधानसभा निवडणुकीत आम्हाला राज ठाकरे यांची अडचण लक्षात आली. त्यांच्यासमोर मुख्य प्रश्न हाच होता की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात आहे. पण त्यांच्या लोकांनी निवडणूक लढवलीच नाही तर तो पक्ष कसा चालणार? आमच्याकडेही त्यांना देण्यासाठी जागा नव्हत्या. आम्ही तीन पक्ष होतो. ती वस्तुस्थिती समजून घेत राज ठाकरे यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतला. इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढून त्यांना चांगली मतं मिळाली, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिश्य चांगली मतं घेतली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिकडे राज ठाकरे यांच्या पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धारावी पुनर्वसन योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य
धारावी पुनर्वसन योजनेत 2011 पर्यंतच्या रहिवाशांना आपण धारावीतच घरं देणार आहोत. धारावी पुनर्वसन योजनेचा आराखडा महाविकास आघाडी सरकारनेच तयार केला आहे. मी फक्त त्यामध्ये टीडीआरसंदर्भातील नियमात बदल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार जे नियमात बसत नाहीत त्यांना भाड्याने घरे देण्यात येतील. या घरांमध्ये ते 11-12 वर्षे राहिले की त्यांना थोडे पैसे भरुन संबंधित घर देण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा