शाहू महाराज वि संजय मंडलिक अशी लढाई नाही, तर...., फडणवीसांनी कोल्हापुरात शड्डू ठोकला
आपण श्रीरामांना मानतो, मग प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आहे. श्रीरामांच्या हातातील तोच बाण संजय मंडलिक आणि मानेंच्या हातात आहे
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात सभेसाठी आले असून येथील व्यासपीठावरुन उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषण करताना थेट गादीचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात केली. फडणवीसांनी मोदींच्या गेल्या 10 वर्षातील विकासकामांचा दाखल देत, मान देऊ गादीला, मत देऊ मोदीला असे म्हणत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. कोल्हापुरातील ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही किंवा धैर्यशील माने विरुद्ध शेट्टी अशी नाही. तर, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे, असे म्हणत फडणवीसांनी कोल्हापुरात शड्डू ठोकल्याचे पाहायला मिळालं.
आपण श्रीरामांना मानतो, मग प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आहे. श्रीरामांच्या हातातील तोच बाण संजय मंडलिक आणि मानेंच्या हातात आहे. त्यामुळे, मोदींच्या हातातही धनुष्यबाण आहे. कोल्हापुरात महायुतीच्या काळात टोलमाफी दिली, पण महाविकास आघाडीने पुन्हा टोल सुरू केला. कोल्हापूर हा भगव्याच्या मागे उभा राहणारा जिल्हा, देशभक्तांच्या मागे उभे राहणारा जिल्हा आहे. देशाला मोदींच्या रुपाने असा नेता मिळाला आहे, ज्यांना देशाला सुरक्षित केलं, देशाला स्वाभीमान दिला, देशाला विकसित केलं. यापूर्वी आपले पंतप्रधान अमेरिकेकडून विणवण्या करायचे, पण मोदींजी सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.
आपल्याला माहिती आहे, हा देश आता अग्नि मिसाईलवाला झालाय. मोदींनी नवभारताची नवनिर्मिती केलीय. कोविडच्य त्या काळात नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते. जगातील लोकं म्हणायचे भारतातील 40 ते 50 कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाहीत. संपूर्ण जग चिंतेत होते, पण भारतात एक वाघ पंतप्रधान होते. या वाघाने आपल्या शास्त्रत्रांना सांगून कोविडची लस भारतात तयार केली. त्यामुळे, भारतातील लोकं जिवंत आहेत. त्यामुळे, मी म्हणेन, आज आपण जिवंत आहोत ते मोदींमुळेच, जान है तो जहान है... म्हणून मोदींना आज मत द्यायचं आहे. संजय मंडलिक आणि माने यांना मतदान करुन मोदींना मत द्यायचं आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरातील जनेतेला आवाहन केलंय.
सांगलीतील प्रचारसभेतही कोरोनाचा मुद्दा
कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्याला लस भेटली आणि म्हणून आपण जिवंत राहू शकलो. 100 देश सांगतात की मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीमधील कडेगावमध्ये सभा झाली. संजयकाकाना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत असल्याचे ते म्हणाले. मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यावर काँग्रेसने काय केले, पण बॉम्बस्फोट झाल्यावर मोदींनी सर्जिकल स्ट्राईक करत दशहतवाद मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, आता दहशतवादी हल्ले बंद झाले आहेत. चीन देखील आता भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नसल्याचे ते म्हणाले.