फुटीर आमदार अडकले, ट्रॅपमध्ये फसले? विधानपरिषद निवडणुकीनंतर आता काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये!
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची एकूण आठ मतं फुटली आहेत. त्यानंतर आता काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. या पक्षातर्फे लवकरच मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election Result) चांगलीच चुरशीची झाली. आपले सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीने आपली ताकत पणाला लावली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतही त्याचा सकारात्मक परिणाम दिला. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे (NCP) समर्थन असलेल्या शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास आठ मतं फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच संभाव्य फुटीर आमदारांना ओळखण्यासाठी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक सापळा रचला होता, या सापळ्यात अडकलेल्या फुटीर आमदारांवर आता कारवाई होणार आहे.
चंद्रकांत हंडोरे झाले होते पराभूत
विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आमची काही मतं फुटली आहेत, हे खुद्द नाना पटोले यांनी मान्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी याआधीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा दाखला दिला. याआधी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसची काही मतं फुटली होती. परिणामी काँग्रेसचे तेव्हाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. हाच दगाफटका आताही होऊ शकतो हे हेरून फुटीर आमदार ओळखण्यासाठी काँग्रेसने यावेळी सापळा रचला होता, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या फुटीर आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असंही नाना पटोले म्हणालेत.
नाना पटोले यांनी नेमकं काय सांगितलं?
"मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे. याआधीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे उभे होते, तेव्हाही असाच प्रकार झाला होता. तेव्हाच्या निवडणुकीतील बदमाश लोक ओळखले गेले नव्हते. मात्र यावेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या सापळ्यात हे बदमाश आमदार सापडले आहेत. आम्ही याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे. पार्टीविरोधी काम करणाऱ्या, पार्टीशी बेईमानी करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्या आमदरांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल," असे स्पष्टपणे नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसची आठ मतं फुटली?
दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची एकूण 8 मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. ही काँग्रेसची मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :
Maharashtra Vidhan Parishad election Result : तिसरा उमेदवार उभा करून मविआने काय मिळवलं? काय गमवलं?
विधानपरिषदेत अजितदादा सरस, काकांना दणका; गुरुवारच्या रात्रीचा 'तो' प्लॅन यशस्वी!